सरला भिडे स्मृतिप्रीत्यर्थ येत्या ७ एप्रिल रोजी होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात पं. रविशंकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘राग श्रद्धा सुमनांजली’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पं. रविशंकर यांनी तयार केलेले राग आणि रचना सादर होणार असून कार्यक्रमाची संकल्पना ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची आहे.
माटुंगा, पश्चिम रेल्वे, (प) येथील कर्नाटक संघाच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ सतारवादक पं. शंकर अभ्यंकर हे पं. रविशंकर यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. सरला भिडे यांनी पं. रविशंकर यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली १८ वर्षे या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. रविशंकर यांनी तयार केलेले राग आणि रचना यावर आधारित सांगीतिक कार्यक्रम सादर होणार असून यात बैरागी, जनसंमोहिनी, परमेश्वरी आदी आणि अन्य रागांचा समावेश आहे. सरला भिडे यांच्याही काही रचना या वेळी सादर केल्या जाणार आहेत. ज्योती काळे, सायली कल्याणपूर, धनश्री घैसास, सोनल शिवकुमार, यती भागवत, सिद्धेश बिचोलकर आदी गायक कलाकार हे राग आणि रचना सादर करणार आहेत.