राज्यात गुटखा पानमसाला सोबतच आता सुगंधित सुपारी, जर्दा आणि माव्यावर बंदी आणलेली असताना शहरातील अनेक पानटपरीवर विक्री सुरू आहे. विशेषत:  अनेक शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरातील पानठेल्यावर गुटखा विक्री केली जात आहे.
दंत महाविद्यालयासह विविध सामाजिक, शैक्षणिक संघटना जनजागृती करीत असल्या तरी आजही विदर्भातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू आणि गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहेत. या गुटखा विक्री करणाऱ्यांना कोण हटवणार? असा प्रश्न आज उपस्थित केला जात आहे. गेल्या पाच वर्षांत गुटखा आणि सिगारेटमुळे महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये कर्करोगासह फुफ्फुसाच्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पंधरा ते पंचवीस या वयोगटातील युवकांचे प्रमाण जास्त असल्याचे काही सामाजिक संघटनांनी आणि शासकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात पानेठेले असू नये असे शासनाचे परिपत्रक असताना शहरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या शेजारी गुटखा आणि तंबाखूची विक्री करणारे पानठेले आहेत. ते हटविण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. शासकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार गुटख्यावर बंदी आणलेली असताना शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये गुटखा सेवनाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात तर प्रत्येक शाळेमागे किमान २० ते २५ विद्यार्थी असे प्रमाण आहे.
काही वर्षांत तोंडाच्या कर्करोगाने अनेकांचे निधन झाले. तंबाखू आणि गुटखा सेवन हे मृत्यूंचे मुख्य कारण आहे. तंबाखू सेवनाने दरवर्षी जवळपास जगात १० लाख लोक मृत्युमुखी पडतात. तंबाखूच्या सवयीमुळे (सिगारेट, बिडी, हुक्का, गुटखा, पानमसाला) हृदयविकाराचा झटका, दम्याचे आजार, क्षयरोग, फुफ्फुसाचे आजार व मुख कर्करोग होण्याची शक्यता जास्त आहे. केवळ बंदी आणून उपयोग नाही तर समाजात त्यासाठी जागृती होणे आवश्यक आहे. शिवाय शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी गुटखा आणि तंबाखू सेवनापासून दूर राहिले पाहिजे, असे दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी सांगितले. दंत महाविद्यालयातर्फे लवकरच जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे.
याबाबत अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त सु.ग. अन्नपुरे यांनी सांगितले, गेल्या महिन्यात शहरातील विविध तपासणी करून शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात असलेल्या पानटपऱ्या हटविण्यात आल्या असून त्यांच्याजवळून गुटखा जप्त करण्यात आला आहे. शिक्षण विभागाला या संदर्भात पत्र देण्यात आले आहे. शाळा परिसरात सिगारेट आणि गुटख्याचे सेवन करणाऱ्यांकडून दोनशे रुपये दंड आकारले जात असून मुख्याध्यापकाला त्याचे अधिकार देण्यात आले आहे. गुटखा सेवन किंवा विक्रीवर प्रशासन कारवाई करीत आहे, मात्र जनतेचा सहभाग यात वाढला पाहिजे, असेही अन्नपुरे म्हणाले.