क्रीडा क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या नाशिकमध्ये आता जिम्नॅस्टिक स्पोर्टस् स्कूल सुरू करण्यात आले असून त्यासाठी नगरसेविका सीमा हिरे व नारायणी युनिव्हर्सल स्पोर्टस् अकॅडमी यांचे योगदान कारणीभूत ठरले आहे.
गंगापूर रोड येथील आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या समर्थ जॉगिंग ट्रॅक येथे ज्येष्ठ क्रीडा मानस तज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नेमीचंद पोद्दार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी हेही उपस्थित होते. या वेळी बाम यांनी प्रत्येक खेळामध्ये शरीरातील लवचिकपणाचे वेगळे महत्व असून लहानपणापासून जिम्नॅस्टिकचा सराव केल्यास पुढे कोणत्याही क्रीडा प्रकारात त्याचा निश्चित उपयोग होतो, असे नमूद केले. पोद्दार यांनी नारायणी युनिव्हर्सल स्पोर्टस् अकॅडमीच्या अनुराधा डोणगावकर, नगरसेविका सीमा हिरे यांच्या या उपक्रमाला कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे यांनी शहराच्या मध्यवस्तीत इतकी मोठी जागा तसेच सुंदर जॉगिंग ट्रॅक असल्याने या ठिकाणी तरण तलाव किंवा इतर क्रीडा प्रकार सुरू केल्यास त्यासाठी शासनाकडून काय मदत होऊ शकते याची माहिती दिली. सीमा हिरे यांच्या हस्ते याप्रसंगी जॉगिंग ट्रॅकवर कायम येणारे ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक मनोहरदास ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत यश मिळविणाऱ्या नाशिकच्या २९ स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.