उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चारही महत्त्वाच्या पक्षाच्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणून विविध प्रश्नांसंबंधात त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी वांद्रय़ातील ‘एच-वेस्ट फेडरेशन’ या रहिवासी संघटनेच्या पुढाकाराने मतदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या प्रिया दत्त, भारतीय जनता पक्षाच्या पूनम महाजन, समाजवादी पक्षाचे फरहान आझमी आणि आपचे फिरोझ पालखीवाला हे उमेदवार उत्तर-मध्यमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना या निमित्ताने एकाच व्यासपीठावर पाचारण करण्यात येणार आहे. या चर्चेचा केंद्रबिंदू रेल्वे, पायाभूत सुविधा, पर्यावरण, महिलांची सुरक्षा आदी आठ विषयांभोवती असणार आहे.
‘या चर्चेतून कोणत्याही एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमचा उद्देश नाही.
केवळ मतदारांना त्यांच्या उमेदवारांची माहिती मिळावी, या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवित आहोत,’ असे एच-वेस्ट फेडरेशनचे नितीन गाडेकर यांनी सांगितले. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात चांदिवली, कुर्ला, कलिना, विलेपार्ले, वांद्रे(पूर्व) आणि वांद्रे (पश्चिम) हा भाग येतो.
वांद्रय़ाच्या हील रोड येथील ‘अपोस्टॉलीक कॅरमल स्कूल’मध्ये ६ एप्रिलला सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. १९९७पासून संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या चर्चेत या भागातील ५०० हून अधिक मतदार सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमात झालेल्या चर्चेचा विस्तृत अहवाल तयार करून इतर मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा विचार आहे, असे गाडेकर यांनी सांगितले.