कोल्हापूर शहरातील श्री महालक्ष्मी रोलर फ्लोअर मिल्स संचालक हरीश जैन याने एम. सी. एक्स. (कमोडिटी मार्केट) अंतर्गत महाराष्ट्र राज्यासह गुजरात, गोवा, कर्नाटक, ओरिसा, हैद्राबाद आदी भागातील ६ हजार ग्राहकांची २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनास माहिती असून कोणतीही कार्यवाही दोषींवर करण्यात आलेली नाही, असा आरोप शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.     या कंपनीचे संचालक हरीश हुंगरमल जैन, आकाश हरेशकुमार जैन, मधु हरेशकुमार जैन यांनी श्रीमहालक्ष्मी रोलर फ्लोअर मिल्स नावाने भगवती कृपा, शिवाजी पार्क येथे जानेवारी २०११ मध्ये शेअर्स मार्केट या नावाखाली कंपनी चालू केली. त्यानंतर संचालकांनी जास्तीत जास्त रक्कम गोळा करण्यासाठी ‘वर्थक्राफ्ट इनकॉर्पोरेशन प्रा.लि.’ ही कंपनी तुषार शुक्राचार्य ओतारी यांच्या नावाने सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या ग्राहकांना महिन्याला ५ ते १० टक्के व्याजाचे व वर्षांला दामदुप्पट-दामतिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून आकर्षित केले. या ग्राहकांना तांत्रिक कारण सांगून महाराष्ट्र राज्यासह गुजरात, गोवा, कर्नाटक, ओरिसा, हैद्राबाद आदी भागातील ६ हजार ग्राहकांच्या कडून सुमारे २५ कोटी रुपये कंपनीने जमा करून घेतले. त्यासाठी कंपनीकडून कंपनीच्या बँक खात्याचे चेक, प्रोमायसरी नोट व रिसिट ग्राहकांना देण्यात आल्या.    
मुदत संपल्यानंतर ग्राहकांनी ऑफिसमध्ये जाऊन पैशाबाबत विचारणा केली असता, ग्राहकांना उडवा-उडवीची उत्तरे वारंवार देण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी कंपनीचे कार्यालय बंद करण्यात आले असून या प्रकरणाची तक्रार काही ग्राहकांनी जिल्हा पोलीस प्रमुख आणि पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे केली. या विरोधात सुमारे २०० ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु प्रशासनाने संगनमताने यातील दोषींवर आजतागायत कोणतीही कारवाई केली नाही. अथवा त्यांची चौकशीही केलेली नाही. याउलट ग्राहकांवरच तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने तातडीने चौकशी करून आरोपींवर कडक गुन्हा नोंद करण्याची गरज आहे. तसेच यामध्ये फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून दिल्याखेरीज शिवसेना स्वस्त बसणार नाही, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी गुंतवणूक केलेले सुनील कागवाडे, शैलेंद्र कुमार यांनी फसवणूक कशी झाली याचा पाढा वाचला.