युरोप आणि इंग्लंडमध्ये अलीकडे मोठय़ा प्रमाणात पडलेल्या बर्फाचा परिणाम कोकणातील हापूस आंब्याच्या विक्रीवर झाला आहे. त्यामुळे आखाती देशानंतर हापूस आंब्यासाठी हुकमी समजल्या जाणाऱ्या युरोप-इंग्लंड बाजारपेठेवरील निर्यातदारांच्या आशा मावळल्या आहेत. या वर्षी आवक जास्त आणि उठाव कमी अशी स्थिती झाली असून देशातील हापूस आंबा खवय्यांना एप्रिल महिन्याच्या अखेपर्यंत हापूस आंब्यावर आडवा हात मारण्यास हरकत नाही. होळी आणि गुढीपाडवा या वर्षी उशिरा आल्याने कोकणातील हापूस बाजारात लवकर आला खरा, पण त्याला किंमत मिळेनाशी झाली आहे. हापूस बाजारात आला असल्याचे अनेकांच्या गावीदेखील नाही. त्यामुळे सध्या हापूस आंबा बऱ्यापैकी स्वस्त झाला असल्याचे दिसून येते.
काही वर्षांपूर्वी हापूस आंब्याची मुंबईतील आवक खऱ्या अर्थाने गुढीपाडव्यापासून होत होती, पण काल्टरच्या या जमान्यात हापूस आंब्याची पहिली पेटी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात दिसू लागली आहे. त्यात या वर्षी होळी आणि गुढीपाडवा सण उशिरा आल्याने हापूस आंब्याचे गणित बिघडले आहे. सर्वसाधारणपणे होळी व गुढीपाडवा मार्च महिन्यात येणारे सण मानले जातात, पण गतवर्षीच्या अधिक मासचा परिणाम हे सण लांबणीवर पडण्यावर झाला आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात हापूस आंब्याची पेटी घरात आणण्याचा विचार करणाऱ्या चाकरमान्यांना या वर्षी हापूस आंबा मोठय़ा प्रमाणात बाजारात आला आहे, याची अजून कल्पना नाही. त्यामुळे मागील आठवडय़ात हापूस आंब्याची आवक तुर्भे येथील फळ बाजारात अचानक फार मोठया प्रमाणात वाढली. आवक तर वाढली, पण भारतीय बाजारपेठेत उठाव नसल्याने हा हापूस दुबईसारख्या आखाती देशात पाठविण्यात आल्याने आता आखाती देशात हापूस आंबा जास्त प्रमाणात गेला आहे.
हापूस आंब्याचे खवय्ये संपूर्ण जगातील भारतीय तसेच पाकिस्तानी, बांगलादेशी आणि श्रीलंकन नागरिक आहेत. त्यामुळे आखाती देशानंतर मोठय़ा प्रमाणात हापूस परदेशात इंग्लंड, युरोप आणि तुरळक प्रमाणात अमेरिकेत पाठविला जातो. या वर्षी हापूस आंब्याची मार्च महिन्यात मोठय़ा प्रमाणात आवक वाढली आणि याच वेळी इंग्लंड व युरोपमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू झाली. त्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने हापूस आंबा युरोप, इंग्लंडमध्ये पोहोचू शकला नाही, अशी माहिती हापूस आंब्याचे प्रसिद्ध निर्यातदार मोहन डोंगरे यांनी दिली.
सर्वसाधारणपणे इंग्लंडमध्ये ६० ते ७० हजार पेटय़ा हापूस आंबा मोसममध्ये जात असतो तर हाच आंबा युरोपमध्ये ५० हजार पेटय़ांपर्यंत पाठवला जातो मात्र या युरोप खंडातील बर्फवृष्टीमुळे हापूस आंब्याची मागणी रोडावली आहे. युरोप आणि इंग्लंडमधील बर्फ निर्यातदारांच्या मुळावर उठला असताना मुंबईमधील हापूस आंबा खवय्यांना अद्याप हापूस आंब्याचा सुगंध आलेला नाही असे दिसून येते. या वर्षी हापूस आंब्याचा मोसम एप्रिल अखेपर्यंत टिकण्याची शक्यता फळ बाजाराचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली. आता आवक वाढल्याने मे महिन्यात हापूस आंब्याची आवक कमी होणार आहे. आजच्या घडीला हापूस आंब्याची आवक ५० हजार पेटय़ांपर्यंत गेली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार आंबा काढून बाजारात पाठविण्यावर भर देत आहेत. याचा परिणाम मे महिन्याच्या आवकवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्यात आवक घटल्याने भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या हापूस आंब्याची कमीत कमी किंमत ७०० रुपये प्रतिडझन असून जास्तीत जास्त हा भाव साडेतीन हजार रुपये आहे. गुढीपाडव्यानंतर हा भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हापूस आंबा खाण्याचा आता खरा महिना मेऐवजी एप्रिल झाला असून या महिन्यात खवय्यांना हापूस आंब्याचा मनसोक्त आनंद घेण्यास हरकत नाही.