‘ज्ञानदान’ हे सर्वात उत्तम असे दान असून त्यापासून कोणीही वंचित राहू नये, या उद्देशाने दान पारमिता ट्रस्टने घरोघरी जाऊन १ लाख रुपये रद्दीतून जमा केले असून शेकडो गरजू तरुणांना शासकीय अनुदानाशिवाय उच्च शिक्षणात मदत करण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे.
 शहरातील विविध भागातून घरोघरी दानपारमिता ट्रस्टच्या चमूने फि रून ७ हजार घरातून १० टन वर्तमानपत्रांची रद्दी एप्रिल महिन्यात जमा केली. यासाठी १५ जणांची चमू नेमण्यात आली होती. जमा करण्यात आलेली रद्दी विकून १ लाख रुपये ट्रस्टला मिळाले. हा जमा झालेला निधी सोमवारी  नि:स्वार्थ भावनेने दोन संस्थांना देण्यात आला. म्हाळगीनगरातील विजया परिवार केअर सेंटर आणि रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट असोसिएशन ऑफ इंडिया नागपूर या दोन संस्थांना प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्यात आले. घरोघरी जाऊन रद्दी जमा करायची आणि ती विकून आलेल्या पैशात गरजूंना शिक्षणात मदत करायची ही मूळ कल्पना डॉ. दादासाहेब बनकर यांची आहे. त्यांनी सर्वप्रथम १९९९ ला घराघरातून रद्दी जमा केली आणि ती विकून आलेल्या पैशात अनेक तरुणांचे आयुष्य उभे केले.
दोन वेळच्या जेवणाची भटकंती करणाऱ्या तरुणांसाठी शिक्षणाची सोय समाजाकडून पैसे जमा करून उपलब्ध करून दिली. याकामासाठी त्यांची मोठी चमू असून बुटीबोरी येथे रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया अशी एक परोपकारी स्वयंसेवी संस्था उभी केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, मोलमजुरी, अपंगत्व असलेल्या तरुणांना नि:शुल्क शिक्षण, राहण्याची, जेवणाची सोय या संस्थेमार्फत केली जाते.  विजया परिवार केअर सेंटर म्हाळगीनगर येथील डॉ. शशिकांत रामटेके यांनी समाजातील मनोरुगण , घरातून बाहेर काढलेल्या व्यक्तींसाठी, मतिमंद व अनेक रोगांचा उपचार नि:शुल्क व नि:स्वार्थ भावनेने डॉ. रामटेके व त्यांच्या पत्नी यांच्यातर्फे केला जातो. १८३ विविध समस्यांनी पीडितांसाठी त्यांनी आपले योगदान दिले आहे. डॉ. रामटेके त्यांच्या भोजनाची व स्वच्छतेची पूर्ण काळजी करत आहे. वृद्ध लोकांच्या नि:शुल्क व नि:स्वार्थ सेवेसा त्यांनी १९९७ पासून सुरुवात केली. आज १४ लोकांचा उपचार व त्यांची देखभाल ते करत आहे. दानपारमिता ट्रस्टच्या वतीने हाती घेतलेला मिशनचा पहिला टप्पा गाठला असून प्राप्त झालेल्या निधीचे वाटप करण्यात आले. यावेळी दान पारमिता ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश संगवई, सचिव नागेश पाटील कोषाध्यक्ष प्रवीण राजवैद्य, विलास देशपांडे, मीना पाटील, अभय सोमलवार, श्रीरंग टेंभेकर, आदी उपस्थित होते.