बदलत्या हवामानामुळे सागरी किनारपट्टीवरील धोक्यात वाढ झाली असून वादळी वाऱ्यांमुळे सागरी किनाऱ्यावरील ओव्हर हेड उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमुळे अपघात होतातच, परंतु आपत्तीनंतर त्यांच्या दुरुस्तीलाही प्रचंड कालावधी लागत असल्याने केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून सागरी किनारपट्टीवरील उच्च दाबाच्या ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात येणार असल्याने त्याचा सव्‍‌र्हे उरण परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती उरण महावितरणचे साहाय्यक अभियंता उपेंद्र सिन्हा यांनी दिली आहे.
वातावरणातील बदलामुळे वर्षभर येणाऱ्या विविध प्रकारच्या वादळांमुळे सर्वात अधिक सागरी किनाऱ्यांवर नुकसान होते. या नुकसानीत वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हर हेड तारा, तसेच खांब तुटल्याने वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडते. त्याचप्रमाणे यामुळे मनुष्य हानी, तसेच अनेक वेळा प्राण्यांनाही विजेचे खांब किंवा तारा अंगावर पडल्याने जीव गमवावे लागतात. वादळानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अनेक दिवस लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करून सुरक्षेचा उपाय म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाने सागरी किनारपट्टीवरील वीज वाहक  केबल भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उरण परिसरात सव्‍‌र्हेही सुरू करण्यात येणार आहे. मात्र भूमिगत केबलद्वारा विद्युत पुरवठा करताना वीज खंडित झाल्यानंतर वीज खंडित होण्याचे कारण शोधण्यासाठी भूमिगत केबलमध्ये अवघड होते. त्यामुळे उरण परिसरात भूमिगत केबल टाकताना किमान तीनशे मीटरवर सांधा ठेवण्याची सूचना आपण करणार असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली आहे. यामुळे दोष शोधणे सोपे होईल. ूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार असल्याने यापुढे उरण परिसरातील वीजपुरवठाही सुरक्षित होणार आहे.