येथील इदगाह मैदान केवळ मुस्लिम समाजाच्या मालकीचे नाही, त्या जमिनीवर काही बलुतेदारांचाही अधिकार आहे. मात्र, ते न सांगता केवळ मुस्लिम कब्रस्तान असल्याचे सांगून सगळय़ांचीच दिशाभूल करण्याचा प्रकार इदगाह ट्रस्टच्या विश्वस्तांनी थांबवावा, असे आवाहन शिवसेना, भाजप, हिंदू एकता आंदोलन, हिंदू जनजागृती, शिवप्रतिष्ठानसह विविध संघटनांच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केले.
कायदेशीर मार्गाने तो प्रश्न सोडविण्याची गरज आहे. असे मत यावेळी मांडण्यात आले.
हिंदू एकताचे नेते व ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, शिवसेनेचे नितीन काशीद, संजय मोहिते, हणमंत घाडगे, भाजपाचे अ‍ॅड. भरत पाटील, शरद देव, विष्णू पाटसकर यांच्यासह  प्रमोद तोडकर तसेच विविध हिंदुत्ववादी संघनांचे नेते व कार्यकर्ते पत्रकार बैठकीला उपस्थित होते. याप्रश्नी हिंदुत्ववादी संघटनांची लवकरच स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल व पुढील दिशा ठरवून त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
विनायक पावसकर म्हणाले की, या जागेत हिंदू लोकांचा हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे. त्यासह त्या जागेत वहिवाट असणारा रस्ताही कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तो आजही हक्क शाबीत आहे. मात्र, इदगाह ट्रस्टींनी चुकीची माहिती देऊन त्यात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तरलक्ष्मीचे तेथे मंदिर होते. त्याचे अवशेष, तेथे असलेल्या मूर्ती व तेथेच मंदिराच्या काही पडक्या भागावरून स्पष्ट होते. इदगाह व मंदिराच्या प्रश्नावरून चार वेळा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठका झाल्या आहेत. त्यामुळे कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संजय मोहिते, भरत पाटील, विष्णू पाटसकर, यांनीही या प्रश्नी ऊहापोह केला.