राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजनेच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला. यात आशा कार्यकर्तीच्या मानधनातही वाढ केली. आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी या कामी पाठपुरावा केला.
आरोग्य संस्थांमध्ये बाळंतपणाचे प्रमाण वाढवून मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. दारिद्रयरेषेखालील, अनुसूचित जाती-जमाती कुटुंबातील मातेचे प्रसूतीचे वय १९ पेक्षा अधिक असणाऱ्या लाभाथीर्ंसाठी ही योजना असून, २ अपत्यापर्यंत योजनेचा लाभ मिळतो. योजनेंतर्गत रुग्णालयात प्रसूती होणाऱ्या ग्रामीण भागातील महिलेस ६०० रुपये व नागरी भागातील महिलेस ५०० रुपये मानधन दिले जाते. तसेच संबंधित लाभार्थीला आरोग्य संस्थेत बाळंतपण करण्यास प्रवृत्त केल्यास आशा कार्यकर्तीस प्रतिलाभार्थी २०० रुपये मानधन मिळत होते. आता नवीन सुधारित बळकटीकरणअंतर्गत या योजनेमध्ये अनुसूचित जाती-जमाती व दारिद्रयरेषेअंतर्गत गरोदर मातांना लाभार्थी समजून आरोग्य संस्थेत प्रसूत झाल्यास पूर्वीप्रमाणे लाभ मिळेल. पात्र लाभार्थीची प्रसूती आरोग्य संस्थेत करण्यास लाभार्थीस प्रवृत्त केल्यास आशा कार्यकर्तीस पूर्वी मिळणारे मानधन २०० रुपये होते. ते तिपटीने वाढवून प्रतिलाभार्थी ६०० रुपये देण्यात येणार आहे.