दिल्लीमध्ये सामूहिक बलात्कार पीडित युवती आज मृत्यूशी संघर्ष करीत असताना नववर्षांच्या स्वागतासाठी शहरातील विविध पंचतारांकित हॉटेल्स, पब आणि रिसोर्ट्समधील रंगारंग कार्यक्रमात कोणतीही कसर शिल्लक ठेवण्यात आलेली नाही. २०१२ वर्ष संपायला तीन दिवस शिल्लक असून शहरातील सर्वच नामवंत हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये डीजेच्या संगीतावर खाण्या-पिण्याची चैन करीत नववर्षांचे स्वागत करण्याची तयारी सुरू झाली आहे.
नववर्षांचे स्वागत करण्याचा तरुणाईमध्ये विशेष उत्साह असतो. त्यामुळे काही ठराविक हॉटेल्स सोडली तर बहुंताश हॉटेल्समध्ये केवळ जोडप्यांना प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. दरवर्षी हॉटेल प्राईड, सेंटर पॉईंट, व्ही. फाईव्ह, हॉटेल तुली इम्पिरियल, चोखर धानी, सन अ‍ॅन्ड सन येथे नववर्ष स्वागतासाठी रंगारंग विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. रामदासपेठेतील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये पॉप सिंगप विकल्प गांधी यांचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय हॉटेल प्राइडमध्ये रशियन नृत्यांगनांना आमंत्रित करण्यात आले आहे.
नागपूर शहरातील विविध हॉटेल्समध्ये युवकांसाठी, हौशी जोडप्यांसाठी थर्टी फर्स्ट नाईटसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल्समध्ये डीजेच्या तालावर थिरकत नववर्षांचे स्वागत करताना ग्राहकांना विविध हॉटेल्समध्ये खाण्याच्या विविध पदार्थाचा आस्वाद मिळणार आहे. जवळपास सर्वच हॉटेल्स, रेस्टॉरेटमध्ये डीजेची धूम ३१ डिसेंबरच्या रात्री वर्ष सरता- सरता ऐकू येणार आहे. हे सर्व डीजे हैद्राबाद, मुंबई, दिल्ली असे बाहेरून बोलाविण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुंताश हॉटेलमध्ये प्रती जोडपे प्रवेश शुल्क २००० ते ५००० रुपये आहे. नामांकित हॉटेल्समध्ये हा दर ५ हजार रुपयांहून अधिक आहे. प्रत्येक हॉटेलची क्षमता सुमारे १५० ते २०० जोडप्यांची आहे. त्याचा हिशोब केल्यास शहरातील नामवंत १० ते १५ हॉटेल्स व परिसरातील रेस्टॉरेटद्वारे एका रात्रीत २ ते ३ कोटी रुपयाहून अधिक आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. याशिवाय अनेक छोटे हॉटेल्स, रेस्टॉरेट, खासगी फार्म हाऊस व लॉन्सवर लहान- मोठय़ा प्रमाणात पार्टीजचे आयोजन असल्याने नववर्षांमुळे नागपूरचे आर्थिक क्षेत्रही फुलणार
आहे.
नववर्षांचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. गेल्या सहा-सात  दिवसापासून थंडीने जोर धरला आहे. त्यामुळे वाढत्या थंडीत गरमा- गरम जेवणाचा व डीजेच्या ठेक्याचा आनंद घेत नववर्षांचे स्वागत करण्यास सर्वच उत्सुक आहेत.     
गेल्या काही वर्षांत नववर्षांच्या स्वागतासाठी शहरातील विविध भागात युवकांचा होणारा हैदोस रोखण्यासाठी किंवा त्यांना विरोध करण्यासाठी काही सामाजिक संघटना समोर येत होत्या. परंतु, गेल्या दोन वर्षांत काही राजकीय आणि सामाजिक संघटनांची विरोध करण्याची भूमिका मवाळ झाली आहे. दरवर्षी बजरंग दल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनमंच, स्त्री शक्ती  या सारख्या सामाजिक आणि राजकीय संघटना युवकांचा होणारा हैदोस रोखण्यासाठी समोर येत होत्या, त्यासाठी शहरात होर्डिग लावले जात होते मात्र यावेळी नव्या वर्षांची सगळीकडे जोमात तयारी सुरू असताना या सामाजिक संघटना मवाळ झाल्या आहेत का? असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.