परभणी- बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल गुरुवारी जाहीर झाला. परभणी जिल्ह्य़ाचा ८६.९२ टक्के निकाल लागला असून या वर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्य़ात ८६.७६ टक्के मुली तर ७९.२९ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. येत्या ६ जून रोजी मुळ गुणपत्रकांचे वाटप शाळेत केले जाणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत ७.९४ टक्के निकाल वाढला आहे.
परभणी जिल्ह्य़ात २२३ उच्च माध्यमिक शाळा आहेत. यापैकी आठ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून पाच शाळांचा निकाल शून्य टक्केलागला आहे. ३५ शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.  परभणी जिल्ह्यातून १४ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. यापैकी १४ हजार ६०९ विद्यार्थी परीक्षेस बसले. १२ हजार ६९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
उस्मानाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ८३.२२ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून ८७.९७ टक्के मुली तर ७९.५३ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ७४.८१ टक्के निकाल लागला होता.
मागील वर्षीच्या निराशाजनक परंपरेला धक्का देत जिल्ह्याचा यंदाचा निकाल समाधानकारक राहिला. लातूर विभागात दुसऱ्या क्रमांकावर जिल्ह्याने यंदाही आपले स्थान कायम ठेवले. कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे तिन्ही जिल्ह्यांचा टक्का गतवर्षी चांगलाच घसरला होता. त्यात आता सुधारणा होत असल्याचे वाढत्या टक्केवारीवरून दिसते. जिल्ह्यातील ६ हजार ५४६ मुले आणि ५ हजार १०२ मुली अशा एकूण  ११ हजार ६४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील ५ हजार २०६ मुले आणि ४ हजार ४८८ मुली असे एकूण ९ हजार ६९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७९.५३ तर मुलींचे ८७.९७ टक्के आहे.
बीड – जिल्ह्य़ाचा बारावीचा निकाल औरंगाबाद विभागामध्ये सर्वाधिक ८३.६० टक्के लागला आहे. यामध्ये मुलींचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. जिल्ह्य़ात ३० हजार १६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये १९ हजार ६६४ मुले, तर १० हजार ४९७ मुलींचा समावेश होता. यात २५ हजार २१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जालना – जिल्ह्य़ाचा बारावीचा निकाल ८०.६६ टक्के लागला. औरंगाबाद विभागात निकालाची सर्वात कमी टक्केवारी जालना जिल्ह्य़ाची आहे. परीक्षेत १२ हजार ९४८ मुला-मुलींनी या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी १२ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
हिंगोली- जिल्ह्य़ाचा बारावीचा निकाल ८४ टक्के लागला. जिल्ह्य़ातून ७ हजार ६७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ७ हजार ४५१ विद्यार्थी परीक्षेत बसले. त्यापैकी ६ हजार २५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.