हैदराबादमधील बॉम्बस्फोटानंतर औरंगाबाद विभागात पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी दहशतवादी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी काही संशयितांची चौकशी केली. हैदराबाद येथील बॉम्बस्फोटालाही मराठवाडा कनेक्शन असल्याने वरिष्ठ सुरक्षा यंत्रणांमार्फतही कारवाई सुरू असल्याचे वृत्त दिवसभर होते. मात्र, यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. एटीएस पथकातील अधिकाऱ्यांनी जामिनावर सुटलेल्या व संशयितांवर नजर ठेवण्यात आली असून त्यांचा ठावठिकाणा शोधला जात असल्याचे सांगितले.
शिवसेनेकडून निषेध
हैदराबाद येथील बॉम्बस्फोटाचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले. क्रांती चौकात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच पाकिस्तानचा झेंडाही शिवसैनिकांनी जाळला. या आंदोलनात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार प्रदीप जैस्वाल, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. ओवेसी मुर्दाबादच्या घोषणाही शिवसैनिकांनी या वेळी दिल्या. (छायाचित्र पान ३ वर)