तेजस्वी लेखणीतून संपूर्ण महाराष्ट्राला झंझावाती विचार देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने आज श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे कै. बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबरोबरच त्याच ठिकाणी चिरंतन स्मारक उभारण्यात यावे, अशा मागणीचा ठराव संजय कुडाळकर यांनी मांडला. त्याला पंडित कोंडेकर यांनी अनुमोदन दिले.
पत्रकार भवन येथे आयोजित या बैठकीत ठाकरे यांच्या प्रतिमेचे सुभाष बोरीकर व रामचंद्र ठिकणे यांच्या हस्ते पूजन झाले. ठाकरे यांनी अग्रलेख आणि व्यंगचित्रे यांच्या माध्यमातून समाज आणि राजकारण याला वेगळी दिशा देण्याचे काम केले. ‘सामना’मध्ये बाळासाहेबांनी लिहिलेल्या अग्रलेखांच्या दुसऱ्या दिवशी इतर वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवरुन बातम्या प्रसिद्ध होत होत्या. यावरून बाळासाहेबांच्या धगधगत्या लेखणीची प्रचिती येते, अशा शब्दांत प्रेस क्लबचे अध्यक्ष अरुण काशिद, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश आंबेकर, धर्मराज जाधव, अनिल दंडगे, अतुल आंबी, संजय कुडाळकर, बाबा राजमाने आदींनी ठाकरे यांना आदरांजली वाहिली. यानंतर स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. शिवाजी पार्क येथे पूर्णाकृती पुतळा व चिरंतन स्मारक व्हावे असा ठराव करण्यात आला. हा बैठकीस सुभाष भस्मे, हुसेन कलावंत, बसवराज कोटगी, सुनील मनोळे, मयूर चिंदे, शीतल पाटील, साईनाथ जाधव, शिवानंद रावळ, उत्तम पाटील यांच्यासह दोन्ही संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार उपस्थित होते.