हिंदी चित्रपटसृष्टीत ‘शंभर कोटींचा क्लब’ ही संकल्पना आल्यापासून आतापर्यंत तब्बल १५ चित्रपटांनी या ‘क्लब’मध्ये शिरकाव करण्यात यश मिळवले आहे. मात्र या सर्व चित्रपटांमध्ये कमाईच्या दृष्टीने आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ अव्वल क्रमांकावर आहे तर कमीत कमी दिवसांत शंभर कोटींचा गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांत सलमान खानच्या ‘एक था टायगर’चा पहिला क्रमांक लागतो. या यादीत सर्वात कमी, म्हणजे शंभर कोटींची कमाई, ‘सिंघम’ या चित्रपटाने केली असून शंभर कोटींचा गल्ला जमवण्यासाठी ‘बोलबच्चन’ या चित्रपटाला सर्वात जास्त, म्हणजे ४५ दिवस लागले. ‘शंभर कोटींचा क्लब’ ही संकल्पना प्रामुख्याने रोहित शेट्टी या दिग्दर्शकाच्या चित्रपटांपासून सुरू झाली. यात अजय देवगणचाही प्रमुख वाटा होता. मात्र या क्लबमध्ये सर्वात जास्त चित्रपट सलमान खानच्या नावावर जमा आहेत. ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’ आणि ‘एक था टायगर’ या चार चित्रपटांसह सलमान शंभर कोटींच्या क्लबमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाने केवळ सहा दिवसांत शंभर कोटींचा गल्ला जमा केला. तर त्याच्या खालोखाल ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटाने आठ दिवसांत ही मजल मारली. सलमानच्या खालोखाल या क्लबमध्ये अजय देवगणचा क्रमांक लागत असून अजयच्या नावावर ‘सिंघम’, ‘गोलमाल ३’ आणि ‘बोलबच्चन’ हे तीन चित्रपट आहेत. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’, ‘गजनी’ या दोन आणि शाहरूख खानच्या ‘रा वन’, ‘डॉन २’ या दोन चित्रपटांनी शंभर कोटींच्या वर गल्ला जमवण्यात यश मिळवले आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांतील या दोघांच्या चित्रपटांची संख्या लक्षात घेता त्यांचा प्रत्येक चित्रपट शंभर कोटींच्या क्लबचा सदस्य ठरला आहे. विशेष म्हणजे यापैकी प्रत्येक चित्रपटाने आपल्या निर्मितिमूल्याच्या किमान दुप्पट कमाई केली आहे. यापैकी पाच चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाले असून इतर २०११ आणि त्याआधी प्रदर्शित झाले आहेत.                                                    
क्र.    चित्रपट        एकूण धंदा (कोटींमध्ये)
१.          थ्री इडियट्स        २०२
२.    एक था टायगर        १९८
३.    दबंग            १४५
४.    बॉडीगार्ड            १४२
५.    रावडी राठोड        १३१
६.    अग्निपथ            १२३
७.    रा वन            ११५
८.    गजनी            ११४
९.    हाऊसफूल २        ११४
१०.    रेडी            ११३
११.    बर्फी            १११
१२.    गोलमाल ३            १०७
१३.       डॉन २            १०६
१४.    बोलबच्चन            १०२
१५    सिंघम            १००
(http://www.koimoi.com या संकेतस्थळावरील माहितीनुसार.. आकडेवारी केवळ भारतातील गल्ल्याची आहे.)