डोंबिवली पश्चिमेतील महापालिकेच्या ‘ह’ प्रभागातील २४ अनधिकृत इमारती, चाळींचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महापालिका प्रशासन गुरुवारपासून सुरू करणार आहे. पुढील दोन दिवसांत ही कारवाई पूर्ण करण्याचा आराखडा महापालिकेने आखला आहे.  
यापैकी बहुतांश बांधकामांमध्ये भूमाफिया तसेच काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा सहभाग असल्यामुळे या कारवाई दरम्यान मोठय़ा प्रमाणात अडथळे निर्माण होण्याची भीती प्रभाग क्षेत्र अधिकारी लहू वाघमारे यांनी विष्णू नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांच्याकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे. या कारवाईसाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि १५ पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी या २४ अनधिकृत इमारतींवर पालिकेने कारवाई केली तर रहिवासी बेघर होतील, अशी भीती यापूर्वी व्यक्त केली आहे. आमदार विनोद तावडे यांच्या मध्यस्तीने या कारवाईवर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्याकडून स्थगिती मिळविली होती. ही स्थगिती मंत्री जाधव यांनी नुकतीच उठविली असून या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त रामनाथ सोनवणे यांना दिले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच ही बांधकामे झाली असल्याचे आमदार तावडे यांनी मंत्री जाधव यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. ही बांधकामे उभी राहत होती त्यावेळी अधिकारी, त्यांचे समर्थक या भूमाफियांशी हातमिळविणी करीत असल्याची टीका या भागातील नागरिकांकडून करण्यात येत होती. पु.भा.भावे सभागृहामागील एका नगरसेवकाच्या भावाची अनधिकृत इमारत मध्यंतरी पाडण्यात आली होती. ती पुन्हा उभी राहिली आहे. याविषयी ‘ह’ प्रभागाचे अधिकारी मूग गिळून बसले आहेत. दरम्यान, विष्णू नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी या इमारतींवर महापालिकेकडून पाणी, वीज तोडण्याची कारवाई गुरुवार आणि शुक्रवारी करण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले. महापालिकेच्या मागणीप्रमाणे पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. पोलीस बळ कमी पडू नये म्हणून वाढीव कुमक मागविण्यात आली आहे, असे स्पष्ट केले.