कळंबोली वसाहतीमधील बैठय़ा चाळींमध्ये घरांचे इमले बांधण्याची जीवघेणी स्पर्धा लागली आहे. तळमजला व त्यावर १२ फुटांचे बांधकाम करण्याची परवानगी असताना केएल-वन आणि एलआयजी वसाहतींमध्ये बैठय़ा घरांचे चक्क चार मजली इमारतीत रूपांतर करण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे कळंबोलीमध्ये असलेल्या मूळ तीन हजार बैठय़ा घरांची आता १२ हजार घरे झाली आहेत.
या घरांची करण्यात आलेली बांधकामे बेकायदा तर आहेतच, परंतु करण्यात आलेल्या बांधकामाच्या मजबुतीबाबत कोणतीही खात्री देता येत नसल्याने या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. सुविधांचा बोजवारा उडाला असून या जीवघेण्या स्पर्धेत नाक्यानाक्यावर रातोरात जन्माला येणाऱ्या बांधकामांमुळे बांधकाम व्यावसायिकांचे फावले आहे. मात्र बैठय़ा चाळींमधील पायाभूत सुविधेचा बोजवारा उडाला आहे.
कळंबोली वसाहत सिडकोने तीन मीटर खोल वसविली. वसाहत खोलवर वसविल्याने दरवर्षी मुसळधार पावसात पाणी साचून वसाहत बुडण्याची भीती कळंबोलीकरांच्या मनात घर करून असते. २००५ च्या पूरपरिस्थितीनंतर कळंबोली ही सर्वाधिक पीडितांची वस्ती त्यामुळेच ठरली गेली आहे. गरजेपोटी केलेल्या वाढीव बांधकामामुळे या पुरामध्ये या वसाहतीमधील बैठय़ा वसाहतींमधील रहिवासी बचावले हे वास्तव आहे. मात्र त्यानंतर कळंबोलीच्या वाढीव बांधकामाला सरकारी मान्यता मिळाल्याप्रमाणे घरांवर मजले चढविण्याची स्पर्धा येथे लागली आहे. शेजारच्याचे बांधकाम दुमजली तर आपले चार मजली अशी येथील खोलीमालकांची धारणा आहे.
अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती येथे राहतात. या बैठय़ा वसाहतींमधील मलनिस्सारण, वीज व जलवाहिनी गेल्या वीस वर्षांपासून बदलल्या गेल्या नाहीत. त्यामुळे शॉर्ट सर्कीट होऊन आगी लागणे, पाणी न येणे, शौचालये तुंबणे अशा समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. तात्पुरती दुरुस्ती करून वेळ मारून नेली जाते. येथील मैदानांवर अतिक्रमणे झाली आहेत. वीस वर्षांपासून रस्त्यांची डागडुजी केलेली नाही. घरासमोर अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. सिडकोने बैठय़ा वसाहतींसाठी भूमिगत केलेली अग्निशमन वाहिनीही मातीच्या अतिक्रमणाच्या भरावाखाली दबून नामशेष झाली आहे. या वसाहतीमधील अरुंद रस्त्यांमुळे आपत्तीच्या वेळी अग्निशमन दल व रुग्णवाहिका पोहचू शकत नाहीत. तीनआसनी रिक्षा चाळीमध्ये येऊ नये यासाठी येथील रहिवाशांनी ही अतिक्रमणाची शक्कल लढविल्याचे सांगण्यात येते. हे सर्व सिडको अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत होत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.