कोपरगाव, राहाता तालुक्यांतील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी देण्यात येईल. या भागातील शेतक-यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे ठोस आश्वासन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास दिले.
नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी कालव्यांना शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याची घोषणा तटकरे यांनी केली. त्याचे फटाके वाजवून, गुलाल उधळून येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कोपरगाव व राहाता तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत तटकरे यांची भेट घेतली. यावेळी ते बालत होते. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड या वेळी उपस्थित होते. आमदार अशोक काळे, युवक नेते बिपीन कोल्हे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्यासह कोपरगाव, राहाता, निफाड, सिन्नर, येवला, पुणतांबा परिसरातील शेतक-यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.  
शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन मिळावे अशी मागणी करण्यात आली. त्यास तटकरे यांनी तत्त्वत: मंजुरी दिली. तटकरे म्हणाले, ज्येष्ठ नेते कोल्हे यांनी पाण्यासाठी सत्याग्रह, रास्ता रोको आंदोलने केली, शेतक-यांना हक्काचे ११ टीएमसी पाणी मिळावे मिळावे म्हणून त्यांची भूमिका रास्तच आहे. पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या दृष्टीने शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. तसे सर्वेक्षणाचे आदेशही दिलेले आहेत. पाटपाण्याबाबत कोपरगाव, राहाता तालुक्यातील शेतक-यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. शिर्डी येथील बैठकीप्रसंगी सहा आवर्तने देण्याचे आपण मान्य केले होते. त्याला आताही बांदील आहोत असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पिचड याप्रसंगी म्हणाले, ज्येष्ठ नेते कोल्हे हे पाटपाण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. ते आयुष्यभर सत्यासाठी भांडले व भांडत आहेत. ज्येष्ठ नेते कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या आहेत व पाटपाण्यासंदर्भात व इतरही प्रलंबीत प्रश्न चर्चेने एकत्रित बसून सोडवण्यासाठी तसेच निळवंडे धरण वर्षभरात पूर्ण करून कालवे कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू आहे.
कोल्हे म्हणाले, गोदावरी कालव्याच्या पाण्यावर नाशिक, निफाड, रानवड, कोपरगाव संजीवनी, गणेश हे साखर कारखाने अवलंबून आहेत. या कारखान्यांवर १० हजार कायम कामगार, ४० हजार कंत्राटी कामगार अवलंबून आहेत. एक कारखाना बंद राहिल्यास ७१ कोटी रुपये व सहा कारखाने बंद राहिल्यास ४२६ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. ३० टीएमसी पाणी जायकवाडीसाठी देऊन कोपरगाव, राहाता, येवला, सिन्नर, निफाड हे तालुके उजाड करणार का, असा सवाल त्यांनी केला.
जाहीर दिलगिरी
बिपीन कोल्हे यांनी कालव्यांना पाणी सोडल्याबद्दल पिचड आणि तटकरे यांचे अभिनंदन केले. तसेच तालुक्याच्या पाणीप्रश्नी माजी मंत्री कोल्हे यांनी अनावधानाने पक्ष सोडण्याबाबत तसेच नेत्यांबाबत काही बोलले असतील तर त्याबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे कोल्हे म्हणाले.
कोल्हे राष्ट्रवादीच राहणार!
ज्येष्ठ नेते कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दापुढे आपण नाही. त्यांनी सांगितले तरच मी राष्ट्रवादी सोडीन, असे सांगत शंकरराव कोल्हे यांनी या विषयावरील भूमिका एकदम बदलली. आधीच्या वक्तव्याबाबत घुमजाव करीत त्यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असे येथे सूचित केले. राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे दुटप्पी वागतात अशी टीकाही त्यांनी केली.