गझलसम्राट गुलाम अली यांच्या ‘एक एहसास’ या गझलसंध्येचे आयोजन टाटा डोकोमोतर्फे शुक्रवार, ३१ मे रोजी संध्याकाळी सात वाजता षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात गुलाम अली ‘चुप के चुप के’ या लोकप्रिय गझलपासून ते ‘ये दिल ये पागल’ व यासारख्या अनेक रसिकप्रिय गझला सादर करणार आहेत. ऱ्हिदम हाऊस, बुक माय शोद्वारे या कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध आहेत.
शनिवारी ‘रवी अनुराग’  
गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सध्या राष्ट्रीय आधुनिक कला दालन अर्थात एनजीएमए येथे टागोर यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शनिवार, १ जून रोजी सायंकाळी ६.३० यानिमित्तच ‘रवी अनुराग’ या संगीत मैफलीचे आयोजनही याच कला दालनाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात करण्यात येत आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका नीला भागवत आणि रवींद्र साहित्याचे अभ्यासक कमल सेन यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा कार्यक्रम एनजीएमएसह छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय व केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात टागोरांची मूळ गाणी सोमा सेन गाणार असून त्याला प्रतिसाद म्हणून रचलेल्या हिंदुस्तानी रागदारी संगीतातील रचना नीला भागवत सादर करतील. तबल्यावर अनुतोष दोघारिया तर हार्मोनियमवर निरंजन लेले साथसंगत करतील. हा कार्यक्रम सर्व संगीत रसिकांसाठी खुला आहे.
‘गुलमोहर’
गुलमोहोराच्या फुलांचे सौंदर्य आपल्या शैलीत उलगडून दाखविण्याचा प्रयत्न चित्रकार बालाजी भांगे यांनी ‘गुलमोहर’ या चित्रप्रदर्शनाद्वारे केला आहे. अ‍ॅक्रिलिक रंगांच्या माध्यमातून त्यांनी चितारलेली चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. निसर्गाने केलेली गुलमोहराच्या वैशिष्टय़पूर्ण लाल रंगाची उधळण पाहून होणारा आनंद जसा अद्वितीय असतो. त्याचप्रमाणे बालाजी यांनी आपल्या चित्रांद्वारे त्याचे सौंदर्य उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.