जालना शहरासाठी थेट जायकवाडीहून राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्या (मंगळवारी) होणार आहे. इंदेवाडी जलकुंभावर या योजनेचे मुख्यमंत्री जलपूजन करतील.
आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, शहराध्यक्ष अब्दुल हफीज यांची या वेळी उपस्थिती होती. सकाळी सव्वाअकरा वाजता मुख्यमंत्र्यांचे जाफराबाद येथे आगमन होईल. तेथील तात्पुरत्या नळ योजनेची ते पाहणी करतील.
दुपारी साडेबारा वाजता जालना शहराजवळील घाणेवाडी तलावातील विहिरी व गाळ काढण्याच्या कामाची पाहणी, एक वाजता जालना पाणी योजनेचे जलपूजन इंदेवाडी येथे होईल. मुख्यमंत्री आपल्या दौऱ्यात दुष्काळी स्थितीवर अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, पावणेचार वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत. अंबड रस्त्यावरील मातोश्री मंगल कार्यालयात हा मेळावा होईल.
मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व काही मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. नवीन पाणीयोजना जालना शहरासाठी अतिशय महत्त्वाची असल्याने स्वत: मुख्यमंत्री जलपूजनास येत आहेत.