मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेत एलबीटीच्या संदर्भात कुठलाच तोडगा निघाला नसल्याने शहरातील व्यापारांचे आंदोलन सुरूच राहणार असून व्यापारी एलबीटीच्या विरोधात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. आंदोलनाच्या अकराव्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठशिवाय चिल्लर विक्रेत्यांची दुकाने बंद होती. या बंदमुळे गेल्या ११ दिवसांमध्ये ८०० कोटीचे व्यवहार ठप्प झाले असून व्हॅटच्या रुपात १०० ते १२५ कोटीचा महसूल बुडाल्याचा दावा चेंबरतर्फे करण्यात आला आहे.
महापालिकांवर लादलेल्या एलबीटीच्या विरोधात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एलबीटी संघर्ष विरोधी कृती समितीचा गेल्या अकरा दिवसांपासून संप सुरू असून शहरातील बाजारपेठा बंद असल्यामुळे राज्य सरकार आणि व्यापारांमध्ये नागरिकांना वेठीस धरले जात आहे. आजही शहरातील  इतवारी, गांधीबाग, धान्य बाजार, सराफा ओळ, गोकुळपेठ, सक्करदरा, सदर, नंदनवन, शंकरनगर, महाल, केळीबाग रोड, मानेवाडा या भागातील व्यापारी प्रतिष्ठाने कमी अधिक प्रमाणात बंद होती. सक्करदरा व्यापारी संघाच्या कार्यकर्त्यांनीदुपारी स्कूटर मिरवणूक काढून मानेवाडा, अयोध्यानगर, बालाजीनगर, रिंगरोड, मेडिकल, या भागातील दुकाने बंद केली. चेंबरच्या कार्यालयात चेंबर आणि एलबीटी संघर्ष विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून सरकारने एलबीटीच्या संदर्भात कुठलीही सकारात्मक भूमिका न घेतल्याने आंदोलन मागे न घेण्याचे आवाहन केले.  
यावेळी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, मुख्यमंत्र्याशी झालेल्या चर्चेत एलबीटीवर कुठलाही तोडगा निघाला नाही. फॅमचे पदाधिकारी मुंबईला उपोषणाला बसणार असून राज्यातील व्यापारी संघटनाचे प्रतिनिधी उपोषणाला बसणार आहे. भारतीय जनता पक्षासह हार्डवेअर असोसिएशन, औषध विक्रेता संघ, लेबर फ्रन्ट आदी २० पेक्षा अधिक व्यापारी आणि सामाजिक संघटनांनी पािठंबा दिला आहे. दरम्यान अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री अनिस अहमद, रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार विजय दर्डा, अजय संचेती यांच्याशी व्यापारी संघटनाशी चर्चा करण्यात आली असून या सर्वानी  मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.