येथील शाहू स्टेडियमवर रविवारी झालेल्या प्रदर्शनिय फुटबॉल सामन्यात भारतीय महिला संघाने स्थानिक कोल्हापूर संघाचा १२ विरुध्द शून्य असा सहजरीत्या पराभव केला. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व राहिले असले तरी स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय संघाविरुध्द लढत देण्याचा अनुभव मिळाला. आता १७ जानेवारीला हॉलंड व भारत यांच्यातील महिला संघात होणाऱ्या सामन्याकडे फुटबॉलप्रेमी करवीरकरांचे लक्ष वेधले आहे.    
कोल्हापुरात फुटबॉल खेळ अतिशय लोकप्रिय आहे. यामध्ये पुरुषांच्या सामन्यांचे प्रमाण अधिक आहे. महिलांचा खेळ मात्र तुलनेने कमी प्रमाणात होतो. महिलांमध्येही फुटबॉलची रुची वाढावी यासाठी हॉलंड व भारत या दोन देशांतील महिलांचा फुटबॉल सामना आयोजित केला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कोल्हापुरात दाखल झाला असून कसून सराव सुरू आहे. सरावाचा भाग म्हणून तसेच स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडूंसमवेत खेळण्याचा अनुभव मिळावा, यासाठी रविवारी सायंकाळी प्रदर्शनिय सामन्याचे आयोजन केले होते.
    राष्ट्रीय संघ असलेल्या भारत संघाचे सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राहिले. भारतीय संघाची कर्णधार सुप्रवा शामल हिने पाचव्याच मिनिटाला गोल नोंदवून खाते उघडले, तर पाठोपाठ सुप्रभवा राऊत हिने पुढच्याच मिनिटाला गोल नोंदविला. लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या परमेश्वरी देवीने १०, २० व २४ व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदविले, तर संगीता बातकोरे हिने १८ व ३१ व्या मिनिटाला गोल केला. टिनारॉयदेवी (२८), स्वाती राऊत (६४) यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर दिग्रेस हिने (४४) व (६९) व्या मिनिटाला चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलला. कोल्हापूरच्या संगीता पाटीलने स्वयंगोलची नोंद केली.     
कोल्हापूर संघाकडून मृदुला शिंदे, सचिता पाटील, पृथ्वी गायकवाड यांनी गोलवर चढाया करीत सामन्यात रंग भरण्याचा प्रयत्न केला. गोलकिपर स्वरूपा दळवीने गोल होण्यासारखे अनेक फटके थोपवून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. एकूण ७० मिनिटांचा सामना झाला. सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. गोल नोंदविल्यावर हालगीच्या निनादावर जल्लोष केला जात होता. सामना पाहण्यासाठी शाहू महाराज, मालोजीराजे, माणिक मंडलिक आदींची उपस्थिती होती.