रिओ द जानेरोमध्ये गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या युरेनियम चित्रपट महोत्सवात प्रदीप इंदुलकर दिग्दर्शित ‘हाय पॉवर’ या तारापूर प्रकल्पबाधित लोकांच्या समस्येवरचा माहितीपट निवडण्यात आला असून ‘यलो ऑस्कर’ पुरस्कारासाठी या माहितीपटाचे नामांकन झाले आहे. हा माहितीपट १६ मेपासून सुरू होत असून २३ मे रोजी  हा माहितीपट दाखविण्यात येईल. विशेष म्हणजे या महोत्सवाला दिग्दर्शक प्रदीप इंदुलकर यांच्यासमवेत तारापूर प्रकल्पबाधितांपैकी एक शेतकरीही जाणार आहेत.  तारापूर प्रकल्पाची वीज ५० वर्षांपूर्वीपासून वापरात आली. प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या लोकांच्या आयुष्यावर झालेले परिणाम या विषयावर हा माहितीपट आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, टॉम ऑल्टर, इला भाटे, शिवानी टिबरेवाला यांसारख्या कलावंतांनी सामाजिक बांधीलकीतून या माहितीपटासाठी आपला आवाज दिला आहे.