नवी मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीमध्ये झालेली बंडखोरी या दोन्ही पक्षांना चांगलीच भोवणार असून कमी मतदानामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक ४५ जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचा अंदाज राज्य गुप्तचर विभागाने वर्तविला आहे. यात शिवसेनेला ३८ तर भाजपला १६ जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. काँग्रेसचे पानिपत होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेकाप खाते उघडणार असून चार अपक्षांची लॉटरी लागणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. येत्या पाच दिवसांत होणाऱ्या प्रचारांच्या झंझावातामुळे हा आकडा थोडय़ा फार प्रमाणात वर-खाली होऊ शकतो.
नवी मुंबई पालिकेच्या लक्षवेधी निवडणुकीतील मतदानाला आता केवळ पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात येणारे शनिवार, रविवार तर उमेदवार मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. अनेक बडय़ा नेत्यांच्या सभा येत्या पाच दिवसांत होणार आहेत. प्रचाराचा शेवटचा टप्पा रंगात आला आहे. प्रत्येक जिल्ह्य़ातील राजकीय घडामोडींची माहिती देणाऱ्या गुप्तचर विभागाने शहरातील या सर्व माहोलचा अभ्यास करून एक प्राथमिक अहवाल तयार केला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये झालेली मोठय़ा प्रमाणातील बंडखोरी, नेत्यांचा उमेदवारांवर सुटलेला ताबा, कमी मतदान, नापसंत नेत्यांची मुशाफिरी, ताई-माईमधील भांडणे, संघपरिवाराचे निद्रासन, बोथट झालेला घराणेशाहीचा आरोप, विकासाला प्राधान्य देणारा मतदार या सर्व कारणांमुळे राजकीयदृष्टय़ा अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला थोडीशी धुकधुकी प्राप्त झाली आहे. या पक्षाला ४५ जागा मिळणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा पालिकेत सत्ता स्थापनेसाठी या पक्षाला काँग्रेस आणि काही अपक्ष उमेदवारांची मदत घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खालोखाल शिवसेनेला ३८ पर्यंत जागा मिळतील, असे पोलिसांनी शासनाला कळविले आहे. ६८ पैकी ३८ प्रभागांत शिवसेनेचा वरचष्मा असून या प्रभागांत शिवसेनेला विजयाची खात्री आहे. त्यानंतर भाजपला १६ जागा देण्यात आल्या आहेत. त्या सर्व बेलापूर मतदारसंघातील असणार आहेत. बेलापूरमध्ये भाजप २३ तर ऐरोलीत २० प्रभाग लढवीत असून ऐरोलीतील प्रभागांवर फुल्ली मारण्यात आली आहे. ऐरोलीतील एक जागा आपल्याला मिळेल असा भाजपचा विश्वास आहे. त्यामुळे बेलापूरमध्ये पुन्हा ताईंचे वर्चस्व सिद्ध होणार आहे, असे या अहवालावरून दिसून येते.
हा शासकीय अहवाल असल्याने त्यात सत्ताधारी पक्षाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, मात्र राजकीय निरीक्षकांच्या मते भाजपचा आकडा डझनभर नगरसेवकांच्या पुढे जाण्याची शक्यता फारच कमी आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार शिवसेना-भाजप युतीलाही पालिकेची सत्ता काबीज करण्याची संधी येणार असून अपक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. काँग्रेसची वाताहत दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सारखीच कायम आहे. त्यामुळे मावळत्या सभागृहात १३ नगरसेवक असलेल्या या पक्षाचे या निवडणुकीत बारा वाजणार असून केवळ अध्र्या जागांवर समाधान मानावे लागणार आहे. निवडून येणारे हे सात तारे केवळ स्वत:च्या प्रकाशावर उजळणार असून त्यात पक्षाचे काहीही योगदान नाही, असे स्पष्ट दिसून येत आहे. या नगरसेवकांनी पहिल्यापासून पक्षापेक्षा स्वत:ला जास्त महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे देशात या पक्षाची दहा महिन्यांपूर्वी लक्तरे वेशीवर टांगली गेली असली तरी नवी मुंबईत ती वीस वर्षांपासून टांगली गेली आहेत. प्रभागातील पक्षाची शे-दीडशे मते वगळता हे नगरसेवक स्वत:च्या जनसंपर्कावर निवडून येणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी या निवडणुकीकडे सपशेल पाठ फिरवली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून लाजेखातर अशोक चव्हाण एक सभा घेणार असून त्यांनी अंबरनाथनंतर या ठिकाणी सभा घेण्याचे ठरविले आहे. यावरून या पक्षाची शहरातील किंमत लक्षात येत आहे. या चार प्रमुख पक्षांबरोबर रायगडची वेस ओलांडून नवी मुंबईत प्रवेश केलेल्या शेकाप नेरुळमध्ये खाते उघडणार असून पक्षाची एक-दोन उमेदवार निवडून येतील, असे गुप्तचर विभागाचा अहवाल म्हणत आहे. आरपीआयची उमेदवारी पण सर्व पक्षांचे ताई, मामा असणारे दोन नगरसेवक व तीन-चार अपक्षांची लॉटरी या निवडणुकीत लागणार आहे.