उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्ह्य़ांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे १८ ऑगस्ट रोजी आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शहरातील व. वा. वाचनालयाच्या नवीन सभागृहात होणारी ही स्पर्धा उत्तर महाराष्ट्राची प्राथमिक फेरी राहणार असून प्रत्येक महाविद्यालयाच्या पाच स्पर्धकांनाच यात भाग घेता येणार आहे. भावगीत, अभंग, भजन हे प्रकार स्पर्धेत सादर करता येणार आहेत.
हिंदी किंवा चित्रपट गीते, नाटय़संगीत हे प्रकार सादर करता येणार नसल्याचे आयोजकांनी कळविले आहे. स्पर्धेत स्पर्धक स्वत:चे वादक आणू शकतील, परंतु प्रतिष्ठानकडूनही वादक मिळतील. सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळात ही स्पर्धा होणार आहे. दुपारच्या सत्रात संगीतकारांचे संमेलन व नवीन संगीतबद्ध केलेल्या रचनांचे सादरीकरण युवा कलावंतांकडून होणार आहे. यात प्रख्यात संगीतकार कमलेश भडकमकर, मिथिलेश पाटणकर, मिलिंद जोशी आदींचा संमेलनात सहभाग असणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी स्व. चांदोरकर प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांच्याशी ९४२२७७४९११ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.