पाथर्डी शिवारात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर या घटनेला नाटय़मय वळण मिळाले असून  या हत्येशी संबंध असल्यावरून दोन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या दत्ता प्रकाश वाघ या गुन्हेगाराचा असल्याचे निष्पन्न झाले. चार दिवसांपूर्वी दोन पोलीस त्याला रात्री घरातून घेऊन गेले होते. त्यानंतर त्याची हत्या झाल्याची तक्रार संबंधिताच्या नातेवाईकांनी केली आहे. संबंधितांविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार करत नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोघा पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे नमूद करत पुढील कारवाईचे आश्वासन दिल्यावर हा वाद मिटला.
पाथर्डी शिवारात दोन दिवसांपूर्वी आढळून आलेला मृतदेह दत्ता प्रकाश वाघ उर्फ विकी (३५) याचा असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही वर्षांपासून शहरात महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून नेण्याचे अगणिक प्रकार घडले होते. या स्वरूपाचे सुमारे ५० गुन्हे दत्ताविरुद्ध दाखल असल्याचे सांगितले जाते. जामिनावर मुक्त असलेल्या या सराईत गुन्हेगाराला सोमवारी रात्री दोन पोलीस होलाराम कॉलनी लगतच्या कस्तुरबा झोपडपट्टीतील घरातून घेऊन गेले. तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईक पोलिसांकडे करत होते. दरम्यानच्या काळात पाथर्डी शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटू नये म्हणून खून करून चेहरा जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या कारणास्तव ओळख पटविण्यात अडचणी येत असताना बुधवारी रात्री हा मृतदेह दत्ता वाघचा असल्याचे स्पष्ट झाले.
संशयिताला घरातून सोमनाथ गुंड व संदीप डावरे हे पोलीस कर्मचारी घेऊन गेल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. या तक्रारीवरून कारवाई करण्यास सरकारवाडा पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला. संबंधित पोलिसांवर कारवाई होईपर्यंत दत्ताचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. यामुळे मंगळवारी दीड ते दोन तास जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ सुरू होता. अखेर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी येथे भेट देऊन नातेवाईकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. संबंधित दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत तथ्य आढळल्यास दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पोलीस उपायुक्तांच्या मध्यस्तीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.