जागितकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीनंतर भारतीय समाजव्यवस्थेत, कुटूंबसंस्थेत अनेक बदल झपाटय़ाने झाले आहेत, होत आहेत. मोबाइल, इंटरनेटचा वापर समाजात वाढत असताना त्याचे फायदे-तोटे लोकांना सहन करावे लागत आहेत. पैशाला आलेले प्रचंड महत्त्व ओळखून हे सगळे बदल होताना दिसतात. प्रत्येकजण या बदलांचा अविभाज्य भाग बनला आहे.
‘धट्टीकट्टी गरिबी, लुळीपांगळी श्रीमंती’ ही जुनी उक्ती काही उपयोगाची नाही हेही समाजाला आता पटले आहे. झपाटय़ाने होणाऱ्या बदलांचा स्वीकार करताना अतिश्रीमंत वर्गातील लोक अधिकाधिक श्रीमंतीचा हव्यास धरताना समाजातील आपल्यापेक्षा कमीश्रीमंत, मध्यमवर्गीय आणि त्याखालच्या वर्गातील मोठय़ा समाजघटकाकडे तिरस्काराने पाहू लागला आहे की काय असेही दिसून येते.
या अतिश्रीमंती वर्गातील लोकांची समाजाप्रती असलेली संवेदनशीलता कमी होताना दिसतेय. यावर टोकदार भाष्य करणारा ‘इन्व्हेस्टमेंट’ हा चित्रपट निश्चितपणे विचार करायला लावणारा आहे, अस्वस्थ करणारा आहे. आजचे पालक मुलांचे संगोपन आणि त्यांच्यावर केला जाणारा खर्च ही आपली गुंतवणूक आहे आणि पुढे जाऊन त्या गुंतवणूकीचे फायदे आपल्याला मिळणार आहेत अशा पद्धतीने मुले वाढवितात की काय असा प्रश्न चित्रपट मांडू पाहतो. थ्रिलर चित्रपटासारखी मांडणी यामुळे प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो.
मराठी चित्रपटांमध्ये अलिकडे सलगपणे कादंबरीवर अथवा कथांवर चित्रपट येत आहेत. ‘इन्व्हेस्टमेंट’ हाही मूळ कथेवरचा लेखकानेच दिग्दर्शित केलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आहे.
आशिष आणि प्राची घोरपडे हे सुखी जोडपे आहे. त्यांचा मुलगा सोहेल हा शाळकरी मुलगा अतिशय हुशार आहे. आशिष व प्राची दोघेही महत्त्वाकांक्षी असून चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम करतात. उंच टॉवरमध्ये आलिशान सदनिकेत राहणारे हे त्रिकोणी सधन कुटूंब असूनही आशिषची शिक्षिका असलेली आई जवळच्याच इमारतीत पण दुसऱ्या घरात राहतेय. लाडाकोडात वाढलेल्या सोहेलला हव्या असतात त्या सगळ्या गोष्टी, खेळणी, व्हिडिओ गेम्स त्याचे ‘डॅड’ त्याला तो मागेल तेव्हा लगेच आणून देतात.
एक दिवस अचानक एक संकट सोहेलवर आणि पर्यायाने घोरपडे कुटूंबावर ओढवते. सोहेलच्या शाळेत शिकणारी दीपा गांगण ही मुलगी  त्याला आवडत असते. सोहेल तिला वाढदिवसाला तिला बोलावतो पण ती येत नाही. नंतर अचानक ती गायब होते म्हणून तिला शोधायला तिचे बाबा श्रीयुत गांगण येतात. नंतर घडणाऱ्या घटनांभोवती चित्रपट फिरत राहतो.
नोकरदार मराठी कुटूंबांमध्ये शहरी, महानगरी परिसरात तरी बहुतांशी नवराबायको नोकरी करणारे असतात. त्यांची मुले बालसंगोपन केंद्रात वाढतात, शाळा सुटल्यानंतर काही काळ घरात एकटी राहतात. आपली मुले आपल्या अपरोक्ष कुणाशी बोलतात, घरी बसून काय टाईमपास करतात, त्यांचे शाळेतील वागणे कसे असते या गोष्टींकडे अनेकदा पालकांचे लक्ष नसते. सुखवस्तु कुटूंबातील पौगंडावस्थेतील शाळकरी मुलांची वागणूक कशी असते हेही दिग्दर्शकाने छोटय़ा छोटय़ा बारकाव्यांतून दाखविले आहे.
दिग्दर्शक आणि छायालेखक यांनी थेटपणे चित्रपटाचे कथानक मांडताना प्रेक्षकाला खिळवून ठेवले आहे. घोरपडे कुटूंबावर आलेले संकट, त्यांचा संघर्ष हे जणू आपल्या शेजारच्याच घरात घडते आहे अशा पद्धतीने त्यात प्रेक्षक रंगून जातो.
सोहेल ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रहर्ष नाईक या बालकलाकाराबरोबरच तुषार दळवी, सुप्रिया विनोद, संदीप पाठक, सुलभा देशपांडे यांनी समरसून भूमिका केल्या आहेत. उच्च मध्यमवर्गीय मराठी कुटूंबातील सासू-सुनेचे नाते दाखवितानाही कॅमेऱ्याद्वारे व्यक्तिरेखांच्या हावभावांतून या नात्यांमध्ये नैसर्गिकपणे असलेली एक प्रकारची अढी दाखवायलाही दिग्दर्शक चुकलेला नाही. श्रीयुत गांगणबरोबरच श्रीमती गांगण ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या भाग्यश्री पाणे यांनीही नैसर्गिक अभिनय केला आहे. रूढार्थाने गाणी, विनोदाची फोडणी नसलेला पण थ्रिलरपटाचा मजेदार अनुभव चित्रपट देतो.

महाद्वार प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘इन्व्हेस्टमेंट’
निर्माते – प्रतिभा मतकरी, मंदार वैद्य, अनिष जोशी
लेखक-दिग्दर्शक – रत्नाकर मतकरी
छायालेखक – अमोल गोळे
संकलक – सागर वंजारी
संगीत व पाश्र्वसंगीत – शंतनू आकेरकर, दिनेश उच्छिल,
माधव विजय
कलावंत – प्रहर्ष नाईक, तुषार दळवी, सुप्रिया विनोद, सुलभा देशपांडे, संदीप पाठक, संजय मोने, सोहम कोळवणकर, मिलिंद फाटक, भाग्यश्री पाणे व अन्य.