अपराध्याला शिक्षा देण्यासाठी अथवा निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी न्यायालयीन खटल्यांमध्ये न्याय वैद्यकशास्त्राची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याने वकिलांना या शास्त्राचे सखोल ज्ञान असणे व त्याविषयी त्यांनी सजगता दाखवणे आवश्यक असल्याचा सूर येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेत वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी लावला.
वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी विशिष्ट आमिषाला बळी पडत पोलिसात दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देत असल्याच्या तक्रारी हल्ली वाढत असल्याचे मान्य करतानाच अशा प्रकरणात नक्कीच कच्चे दुवे राहत असल्याने कौशल्यप्राप्त वकील अशा बनावट प्रमाणपत्रांना न्यायालयात आव्हान देऊन सत्य समोर आणू शकतात, असा विश्वास या तज्ज्ञांनी व्यक्त केला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वर्धमान अहिवळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘न्याय वैद्यकशास्त्र’ या विषयावर आयोजित या व्याखानमालेत येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश चेवले, डॉ. एम. सी. शेख तसेच शहरातील प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. विक्रम वैद्य यांनी मार्गदर्शन केले. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन या तिघांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. रुग्णाच्या मृत्यूपूर्व जबाबाची कार्यपद्धती, रुग्णाच्या मृत्यूची निश्चित कारणे आणि कालमान शोधण्याच्या पद्धती, बलात्काराच्या प्रकरणात पीडिताची वैद्यकीय तपासणी करताना घ्यावयाची काळजी, विषबाधा तसेच अपघातातील मृताचे शवविच्छेदन आदी विषयांवर या डॉक्टरांनी माहिती दिली.
प्रास्ताविकात प्रा. आर. जे. भोवते यांनी व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. सूत्रसंचालन शैलेंद्र गायकवाड यांनी केले. आभार सचिन निकम यांनी मानले. महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी नाना चव्हाण यांना पुणे विद्यापीठातर्फे नुकताच आदर्श पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या   वेळी  प्रा.   एस.   के.   खुने,  प्रा.   राकेश भोसले,   ग्रंथपाल  नीलेश नागरे आदी उपस्थित होते.