कल्याण पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानकातील स्कायवॉक फेरीवाल्यांनी पूर्णपणे काबीज करून टाकले आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्कायवॉकवरून चालणेही अवघड झाले आहे. स्कायवॉकच्या दुतर्फा गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाले ठाण मांडून बसत असताना रेल्वे स्टेशन मास्तर, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि कल्याण-डोंबिवली पालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांविरुद्ध मूग गिळून बसल्याने नागरिकांचा संताप झाला आहे. आता या संतापाचा उद्रेक झाला असून कल्याण नागरी समितीने या फेरीवाल्यांना येत्या आठवडाभरात स्कायवॉकवरून हटवले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे व पालिका आयुक्तांना दिला आहे.
नगरसविकास प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांना या गंभीर विषयाची माहिती नागरी तक्रार निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने कल्याण-डोंबिवली पालिकेला कल्याण पश्चिमेत स्कायवॉक बांधून दिले आहेत. या स्कायवॉकवर सुरुवातीच्या काळात फेरीवाले बसत नव्हते. पालिकेच्या मुख्यालयाजवळील ‘क’ प्रभागात गणेश बोराडे प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून आले आणि त्यानंतर स्कायवॉकवरील फेरीवाल्यांची संख्या वाढली असा नगरसेवकांचा आरोप आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर वेळोवेळी चर्चा झाली आहे. बोराडे लाचखोरी प्रकरणात निलंबित आहे. स्कायवॉकवरील फेरीवाले हे रेल्वे पोलीस, सुरक्षा जवान आणि पालिका कर्मचाऱ्यांचे कामधेनुसारखे साधन झाले असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे नागरी निवारण समितीचे म्हणणे आहे.
एमएमआरडीएने जाहिरातींच्या हक्कांसकट स्कायवॉक पालिकेकडे देखरेखीसाठी द्यावा. त्यामुळे प्रशासनाला त्यावरील अतिक्रमण रोखता येईल, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. मात्र अशा प्रकारचे अधिकार देण्यास एमएमआरडीए तयार नाही. एमएमआरडीएने फेरीवाले व भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची भूमिका पार पाडावी अशी ताठर भूमिका पालिकेने घेतली आहे. दरम्यान, नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी रेल्वे पोलिसांसह पालिका अधिकाऱ्यांना स्कायवॉकवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी बजावले होते पण ही कारवाई फक्त दोन ते तीन दिवस करण्यात आली. स्कायवॉकवर फेरीवाले, गर्दुल्ले बसतात. त्यांचे निवासस्थान स्कायवॉकवर असल्याने तेथे ते घाण करतात, असे नागरी समितीने म्हटले आहे.
स्कायवॉकच्या पश्चिम बाजूकडे दररोज सकाळी आठ ते रात्री अकरापर्यंत सुमारे ७० ते ८० फेरीवाले प्रवाशांचा रस्ता अडवून व्यवसाय करतात. गणेश बोराडे असताना पालिकेत ओरडा झाला की जुजबी कारवाई केली जायची. बोराडे निलंबित झाल्यानंतर ती कारवाईही गेल्या काही महिन्यांपासून थंडावली आहे. आताचे क, ग आणि फ प्रभागाचे क्षेत्र अधिकारी निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहेत. त्यामुळे ‘जाता जाता मारू हात आणि होऊ निवृत्त’ पद्धतीने त्यांचा कारभार सुरू असल्याची टीका होत आहे. स्टेशन मास्तर, रेल्वे सुरक्षा बल, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या कामधेनूचे फेरीवाले हे साधन असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
संयुक्त कारवाई गरजेची
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले, डोंबिवली आणि कल्याणमधील रेल्वे स्थानकांमध्ये जे स्कायवॉक आहेत त्यामधील काही भाग रेल्वेच्या हद्दीत तर काही भाग कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई रेल्वे सुरक्षा बल व पालिका कर्मचारी यांनी संयुक्तपणे करणे आवश्यक आहे. स्कायवॉकवर व प्रवाशांना अडथळा होईल अशा पद्धतीने फेरीवाले बसत असतील तर आपण तातडीने रेल्वे सुरक्षा बलाच्या उपायुक्तांना कारवाईसाठी सूचित करतो. पाटील यांच्या आदेशानंतर दोन दिवस कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटवण्याची कारवाई करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच फेरीवाल्यांनी आपली दुकाने पुन्हा मांडली आहेत.