मधुमेहामुळे, भाजल्यामुळे तसेच अपघातात झालेल्या जखमा भरून येण्यासाठी आता एक नवा वैद्यकीय पर्याय पुण्यात उपलब्ध झाला आहे. अमेरिकेतील ‘इनोव्हेटिव्ह हीलिंग सिस्टिम्स’ या कंपनीतर्फे केईएम रुग्णालयात ‘हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे.
रुग्णालयातर्फे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. इनोव्हेटिव्ह हीलिंग सिस्टिम्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र पटेल, कंपनीचे क्षेत्रीय वैद्यकीय संचालक डॉ. मन्मत वैष्णव, डॉ. सुमीत भट्टी, डॉ. अभिजित जोशी या वेळी उपस्थित होते.  या उपचार पद्धतीत रुग्णाला एका पारदर्शक दबावगृहात शंभर टक्के शुद्ध ऑक्सिजन श्वासावाटे दिला जातो. रुग्णास एका वेळेस साधारणतपणे ६० ते ९० मिनिटे अशा दबावगृहात ठेवले जाते. या वेळात रुग्ण नेहमीपेक्षा २० ते ३० पटींनी अधिक ऑक्सिजन ग्रहण करतो. शरीरात जेथे रक्तप्रवाह कमी झालेला असतो तेथेही पुरेसा ऑक्सिजन पुरवला गेल्याने नव्या पेशी निर्माण होण्यास मदत होऊन जखमा जलदगतीने भरून येऊ शकतात. रुग्णांना जखम पूर्ण भरून येण्यासाठी या उपचारांची सुमारे वीस सत्रे पूर्ण करावे लागतात. ‘कम्पार्टमेंटल सिंड्रोम’ आणि ‘ट्रॉमॅटिक इचेमिया’ या आजारांतही हे उपचार उपयुक्त ठरतील, अशी माहिती या वेळी देण्यात आली