चित्रपट निर्मिती क्षेत्रात आतापर्यंत मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील मंडळींची मक्तेदारी राहिली असली तरी खान्देशातील अनेक जण या क्षेत्रात पुढे येत असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसू लागले आहे. विशेषत: चित्रपट निर्मितीसह दिग्दर्शनात ठसा उमटविणारे ‘धग’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे चाळीसगावचे शिवाजी पाटील असोत किंवा साक्री, धुळे या ठिकाणी अहिराणी भाषेत व्हिडिओपट बनविणारे स्थानिक कलाकार असोत, त्यांनी आपल्या परीने या क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यात आता चोपडय़ासारख्या छोटय़ा तालुक्याचीही भर पडली असून संजय सोनारो निर्मित ‘वीर जवान’ हा चित्रपट नुकताच पूर्ण झाला असून त्याचे व्यावसायिकरित्या प्रदर्शन लवकरच होणार आहे.
मुंबई, पुणे या महानगरांमध्ये चित्रपट निर्मितीसाठी असणारी यंत्रणा सहज उपलब्ध होऊ शकते. खान्देशसारख्या ग्रामीण भागात मात्र त्यासाठी आवश्यक साहित्य, तंत्रज्ञान उपलब्ध होणे खूपच कठीण. ही सर्व जमवाजमव करताना निर्मितीचा खर्चही वाढत जातो. त्यामुळे चित्रपट निर्मिती म्हणजे एकप्रकारे तारेवरची कसरतच ठरते. परंतु या क्षेत्रात खान्देशचे नाव कुठेतरी झळकविण्याची उर्मी आणि स्थानिक कलावंतांना रूपेरी पडद्यावर आपले अभिनय गुण दाखविण्याची संधी मिळावी या हेतूने चोपडय़ाचे संजय सोनार हे चार वर्षांपासून वीर जवान या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत गुंतले होते. चित्रपट निर्मितीची कोणतीही पाश्र्वभूमी नसतांना साहित्य, तंत्रज्ञान, प्रशिक्षण या सर्वाची ओळख करीत त्यांनी उपलब्ध साहित्यासह कमी खर्चात या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाला ‘सेन्सॉर बोर्ड’ेचे प्रमाणपत्रही मिळाले असून लवकरच त्याचे प्रदर्शन होणार आहे. चित्रपट किती व्यवसाय करणार हा विषय सोनार यांच्यासाठी गौण आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारही चित्रपट निर्मिती करू शकतात याचा दाखला देण्याचा त्यांचा हेतू पूर्ण झाला आहे. देशसेवेसाठी जीव देण्यास तयार असलेल्या पोलीस अधिकारी, गरीब प्रामाणिक शेतकरी, तसेच सर्वधर्म समभाव जपत मैत्री जपणाऱ्या चार बालकांची गोष्ट सोनार यांनी चित्रपटात मांडली आहे.
चित्रपटातील मुख्य भूमिकेत स्थानिक कलावंत नीलेश कुमार आहे. त्यांच्या जोडीला भोजपुरी नायिका श्रीकंकाणी आहेत. चित्रीकरण चोपडा परिसरातच करण्यात आले आहे. सोनार यांनी निर्माता, दिग्दर्शक, कथा, पटकथा, गीते, कॅमेरा अशा विविध तांत्रिक बाबींवर काम केले आहे