औसा रस्त्यावर मंगळवारी विचित्र अपघातात तिघांना आपले प्राण गमवावे लागले. त्यात दोन पोलीस व एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, शिरूर अनंतपाळला जाणारे पथक औसा रस्त्याकडे का वळले? याचा तपास करून संबंधितांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हय़ाची नोंद होण्याची गरज आहे. एका घटनेत कडक शिक्षा झाली तरच अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. अन्यथा ‘ओलेही जळते..’ असा समज करून घेऊन लोक आपल्या वागण्यात बदल करणार नाहीत, अशी स्थिती आहे.
एखादा अपघात घडून गेल्यानंतर काय करायला नको होते, काय व्हायला हवे होते, याची चर्चा होते. मात्र, ही चर्चा तेवढय़ापुरतीच राहते. पुढे या चर्चेचा तपशील कोणाच्या लक्षातही राहात नाही. साहजिकच पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ हा क्रम चालू होतो. वासनगाव पाटीजवळ मंगळवारी झालेल्या अपघातात वाळूने भरलेल्या मालमोटारीने पोलीस जीप, काळीपिवळी व दुचाकीला धडक दिली. अवैध वाहतूक प्रतिबंधक पथकातील पोलीस शिरूर अनंतपाळ येथे जाण्यास निघाले होते. पोलीस मुख्यालयात तशी नोंद आहे. मात्र, हे पथक कोणत्या कारणासाठी औसा रस्त्याकडे वळले? हे त्यांचे त्यांनाच माहीत. शिरूर अनंतपाळ येथील पोलीस उपनिरीक्षक महेश लांडगे या पथकाचे प्रमुख होते. महादेव खंडागळे हे बँडपथकात काम करणारे पोलीस कर्मचारी. मात्र, त्यांना अवैध वाहतूक पथकात नियुक्ती दिली गेली. नव्यानेच पोलीस दलात दाखल झालेल्या सुवर्णा भारती यांनाही या पथकात संधी दिली गेली.
अवैध वाहतूक तपासणी सुरू करीत असताना ज्या ठिकाणी तपासणी केली जाते, त्याच्या मागेपुढे किमान ५०० मीटर अंतरावर येणाऱ्या वाहनांसाठी अडथळा निर्माण करून तपासणी करणे आवश्यक आहे. मंगळवारी अशा प्रकारे कोणतेही साहित्य सोबत नसताना अचानक काळीपिवळीला धडक देऊन दुचाकीचा चेंदामेंदा केला. दुचाकीवर बसलेला आठ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला. तपासणी करणारे पोलीस कर्मचारी महादेव खंडागळे जागीच मरण पावले, तर सुवर्णा भारती या महिला कर्मचारी रुग्णालयात उपचार घेताना सायंकाळी ७ वाजता मरण पावल्या.
दरवर्षी रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढते आहे. वाहतुकीचे नियम वाहनचालकाने न पाळल्यामुळेच अपघात घडतात, असे वारंवार सांगितले जाते. नियम पाळण्याची आता सवय कोणालाच राहिलेली नाही, त्यामुळे पोलिसांकडून तरी अशी अपेक्षा कशी करायची?