मोनोरेलमधून आठवडाभरात तब्बल एक लाख ३६ हजार मुंबईकरांनी प्रवास केल्याची जाहिरात करत ‘एमएमआरडीए’ने आपणच आपली पाठ थोपटून घेतली खरी; पण मोनोरेलची क्षमता आणि तिच्या फेऱ्यांचे गणित तपासले तर मोनोरेल क्षमतेच्या निम्म्याहून अधिक रिकामीच धावत असल्याचे चित्र समोर येत आहे.
चेंबूर ते वडाळा या ८.९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोनोरेल २ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. उंचावरून धावणाऱ्या या रंगीबेरंगी आणि वातानुकूलित गाडीतून प्रवासाची गंमत अनुभवण्यासाठी पहिल्या रविवारी झुंबड उडाली. मोनोरेलची स्थानके प्रवाशांच्या गर्दीने ओसंडून वाहत होती. पण नंतर मात्र मोनो गर्दीने भरभरून वाहत असल्याचे चित्र दिसले नाही.
रविवार, ९ फेब्रुवारी रोजी मोनोरेलच्या आगमनाला एक आठवडा पूर्ण झाला. पहिल्याच आठवडय़ात मोनोच्या तिकीट विक्रीने एक लाखाचा आकडा पार केला आणि तब्बल १४ लाख रुपयांची घसघशीत कमाई केली. पहिल्या आठवडय़ात १ लाख ३६ हजार ८६५ मुंबईकरांनी मोनोरेलमधून प्रवास केला. आठवडाभरात एक लाख ३२ हजार ५२३ तिकिटांची विक्री झाली. तर तब्बल १४०९ लोकांनी कुपन्स घेऊन प्रवासाचा आनंद लुटला. आठवडाभरात मोनो रेलने एकूण ५१२ फेऱ्या केल्या. पहिल्याच आठवडय़ात मोनोचे उत्पन्न १४ लाख २४ हजार ८१० रुपये एवढे झाले.
‘एमएमआरडीए’ मोनोच्या यशाची कहाणी सांगत असताना त्यांनीच दिलेल्या आकडय़ांवरून मोनोरेल निम्म्याहून अधिक रिकामी धावत असल्याचे दिसून येत आहे. मोनोरेलची क्षमता ५६८ प्रवाशांची आहे. आठवडाभरात ५१२ फेऱ्या झाल्याचे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले. म्हणजे मोनोरेल पूर्णपणे भरून धावली असती तर तब्बल २ लाख ९० हजार ८१६ मुंबईकरांना प्रवासाची संधी मिळाली असती. पण खुद्द ‘एमएमआरडीए’च्या दाव्यानुसार केवळ एक लाख ३६ हजार प्रवाशांनी आठवडाभरात प्रवास केला. म्हणजेच मोनोरेलमधील प्रवासी क्षमतेपेक्षा निम्म्याहून कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. मोनोरेलची प्रवासी वाहतूक ही क्षमतेपेक्षा सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी असताना मोनोरेल ही ‘मनीरेल’ ठरत असल्याचा प्राधिकरणाचा दावा किती पोकळ आहे हेच त्यावरून दिसून येत आहे.