परभणी शहर वळण रस्त्यासाठी शेतजमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. वळण रस्त्यासाठी वांगी व कारेगाव शिवारातील २६ एकर २३ गुंठे जमीन संपादित करण्यात येणार आहे. या साठी ७२ कोटी खर्च अपेक्षित आहे. जिल्हा विकास मंडळातून १२ कोटींचा निधी रस्त्यासाठी देण्यात आला. निधीअभावी वळण रस्त्याचे काम रखडू नये, या साठी लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे.
गेल्या १५-२० वर्षांपासून परभणी शहर वळण रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. पाथरी रस्त्यावरील रेणुका मंगल कार्यालयाजवळून सुरू होऊन हा रस्ता वसमत रस्त्यावर अमोल पेट्रोलपंपाजवळ येणार आहे. वळण रस्ता जवळपास ९ किलोमीटर लांबीचा आहे. निधीअभावी वळण रस्त्याचे काम अडगळीत पडले होते. सात वर्षांपूर्वी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. त्यामुळे वळण रस्त्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली. या रस्त्यासाठी किमान ७२ कोटी लागतील. शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यास पुन्हा काम रखडले जाऊ शकते. कारेगाव शिवारातील चार एकर १३ गुंठे व वांगी शिवारातील २२ एकर १० गुंठे जमीन संपादित करण्यात येणार आहे. परंतु निधीची कमतरता पडण्याचीच भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वळण रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी सरकारकडून आवश्यक निधी मिळण्याची गरज आहे.