सात वर्षांपूर्वी ठाणे शहरात कार्यान्वित झालेल्या कै. वामनराव ओक रक्तपेढीने आतापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी भरविण्यात आलेल्या ८०० शिबिरांच्या माध्यमातून तब्बल २७ हजार रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. एकाच वेळी दीड हजार रक्तपिशव्या संकलित करण्याची क्षमता असणारी ही ठाणे जिल्ह्य़ातील सर्वात मोठी रक्तपेढी आहे. याशिवाय वर्षभरात किमान एकदा थेट रक्तपेढीत येऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या साडेसहा हजार आहे. रक्तदान चळवळीला हातभार लावणाऱ्या, त्याचा परिघ वाढविणाऱ्या शिबीर संयोजकांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार ११ जानेवारी रोजी सहयोग मंदिर येथे सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. अर्थतज्ज्ञ विनायकराव गोविलकर, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. इंगळहळीकर आणि व्हॅल्यूएबल इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक डॉ. शैलजा गायकवाड यावेळी उपस्थित राहणार आहेत. अतिशय निष्ठेने रक्तदान चळवळीत कार्यरत असलेल्यांचे कौतुक करावे हा या मेळाव्याचा उद्देश आहे.  
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने देशभरात अशा प्रकारच्या १७ रक्तपेढय़ा कार्यरत असून त्यापैकी १४ महाराष्ट्रात आहेत. अत्याधुनिक पद्धतीने पूर्णत: स्वेच्छावृत्तीने येथे रक्त संकलित केले जाते. रक्त निर्मितीत आपली स्वत:ची अशी कोणतीही कर्तबगारी नसते. पुन्हा ते दिल्याने कोणतीही शारीरिक हानी होत नाही. मात्र रक्तदानामुळे आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, हा विचार ठाण्यातील जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यातही या रक्तपेढीचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आता आपले वाढदिवस स्वेच्छा रक्तदानाने साजरे करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रक्तातील प्लेटलेटस्, प्लाझ्मा हे घटक वेगळे काढण्याचीही येथे सोय आहे. आतापर्यंत ४६ हजार रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. २०१३ मध्ये या रक्तपेढीने पाच हजार रक्तपेढय़ा संकलित केल्या. त्यामुळे शासनाने तिला प्रादेशिक रक्त संकलन केंद्राचा दर्जा दिला आहे.
प्रमाणित दरापेक्षा कमी
शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे रक्त पिशवीचा दर १४५० रुपये आहे. मात्र वामनराव ओक रक्तपेढीत त्यापेक्षा कमी म्हणजे १३०० रुपयांना रक्तपिशवी दिली जाते. रुग्ण जर सरकारी रुग्णालयात उपचार घेत असेल तर त्यापेक्षा कमी म्हणजे एक हजार रुपयांमध्ये त्याला रक्त उपलब्ध करून दिले जाते. डायलेसिसच्या रुग्णांनाही याच दरात रक्त मिळते. थॅलिसेमियाच्या रुग्णांना विनामूल्य रक्त दिले जाते.
रक्त संकलन केंद्र
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये एकूणच आरोग्य सेवांचे प्रमाण कमी आहे. रक्तपेढय़ाही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे ठाण्यातून रक्त घेऊन जावे लागते. त्यात बराच वेळ जातो. त्यासाठी दोन्ही जिल्ह्य़ांत एकूण दहा रक्त संकलन केंद्रे स्थापन करण्याची वामनराव ओक रक्तपेढीची योजना आहे. त्यापैकी नालासोपारा येथे पहिले संकलन केंद्र सुरू झाले आहे. येत्या तीन वर्षांत रक्तपेढीतील यंत्रणा पूर्णत: अद्ययावत होईल. तसेच थॅलिसेमियाच्या रुग्णांचे केंद्र सुरू केले जाईल, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह अतुल धर्मे यांनी दिली. जास्तीत जास्त नागरिकांनी स्वेच्छा रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.