उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातील धरणांतून १० टीएमसीपर्यंत पाणी मिळू शकते. परंतु त्याबाबत सोलापूर जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी आक्रमक पवित्रा न घेता बोटचेपेपणाची भूमिका घेत असल्याबद्दल सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुक्यातील नेते तथा भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. तानाजी सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. उजनी धरणाच्या पाणीप्रश्नावर येत्या २९ जानेवारी रोजी माढा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात येथे पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना प्रा. सावंत यांनी उजनी धरणात पाणी नसल्याचा समज प्रशासनाकडून चुकीच्या पध्दतीने पसरविला जात असल्याचा आरोप केला. या धरणात सद्य:स्थितीत ४९०  मीटरच्यावर कालवा बेड पातळीवर तीन मीटपर्यंत म्हणजे १७ ते १८ टीएमसी  पाणी शिल्लक आहे. धरणाच्या गाळमोरीवर ५८ ते ६० टीएमसी पाणी शिल्लक असताना प्रशासनाकडून धरणात पाणीच शिल्लक नसल्याचा समज पसरवून शेतीसाठी पाणी सोडण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेती जगविण्यासाठी धरणातून तातडीने पाणी न सोडल्यास येत्या मंगळवारी, २९ जानेवारी रोजी माढा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्यात येईल, असे प्रा. सावंत यांनी स्पष्ट केले. उजनी धरणातील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखून ठेवल्यामुळे शेती प्रचंड नुकसानीत आली आहे. या धरणावर सोलापूरसह पुणे व अहमदनगर हे जिल्हे अवलंबून आहेत. एकीकडे धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याचे सांगताना प्रशासनाकडून धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्य़ात उजनी धरणावरून आठ तास विद्युतपुरवठा केला जात असल्यामुळे हा सरळ सरळ अन्याय असल्याची प्रतिक्रिया प्रा. सावंत यांनी नोंदविली. या पत्रकार परिषदेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव संजय पाटील-घाटणेकर,  माढा तालुका पंचायत समितीचे सदस्य भारत शिंदे, भारत पाटील, जयंत पाटील आदी उपस्थित होते.