जीवन म्हणजे स्पर्धा मानून स्पर्धेचा घोडा बनून धावत राहणे यातून जगण्यातील आनंदच हरवून जातो, असे मत प्रसाद पुरंदरे यांनी व्यक्त केले. वेध कार्यक्रमांतर्गत मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी पुरंदरे यांची प्रकट मुलाखत घेतली. अर्थतज्ज्ञ डॉ. रूपा रेगे, प्रसाद पुरंदरे, अ‍ॅड. असिम सरोदे, नरेंद्र राहुरीकर, स्पृहा जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर डॉ. नाडकर्णी यांनी उलगडून दाखवले. ‘कर्तृत्वाचे मोजमाप’ नेमके कसे करायला हवे हे विद्यार्थी व पालकांसमोर येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दयानंद सभागृहात हा कार्यक्रम झाला.
इतिहासाचे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांचे चिरंजीव प्रसाद यांना आई-वडिलांकडून चाकोरीबाहेरचे जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे विविध विषयांत रस घेत आपल्याला जीवनाचा आनंद घेता आला, असे सांगितले. खेळण्यात साहस दाखवतो, त्याला जीवनात कोणत्याही क्षेत्रात अपयश येत नाही, असे पुरंदरे म्हणाले. मोटारसायकल रेसिंग, गिर्यारोहण, पॅराग्लाईडिंग, नाटय़ अभिनय, अ‍ॅटोमोबाईल रेसिंग या बाबत पुरंदरे यांनी रस घेऊन त्यात वेगळा ठसा उमटवला. विद्यार्थ्यांनी जगताना आपले ध्येय निश्चित करावे. मात्र, झापडबंद पद्धतीच्या जगण्यात अडकवून घेऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला.
आई-वडील एकाच वेळी विविध विषयात आपल्या मुलाने रस घ्यावा, यासाठी त्याच्या इच्छेचा विचार न करता त्याच्यावर आपल्या इच्छा लादतात. यासाठी पालकांनीच स्वत:ला तपासून घ्यावे, असे त्यांनी विचारले. निसर्गाच्या सान्निध्यात शनिवार, रविवार अख्खे कुटुंब निघाल्याचे चित्र किमान महाराष्ट्रात दिसायला हवे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रा. मे. पु. रेगे यांच्या कन्या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. रूपा रेगे यांनी मुलाखतीत अतिशय मनमोकळी उत्तरे दिली. उदारमतवादी आई-वडिलांमुळेच जीवनातील यशस्वी शिखर गाठू शकलो, असे सांगत आपल्या कर्तृत्वाबद्दल आंतरिक समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षितता मिळण्यापुरता पैसा कमावला पाहिजे. साहस, धैर्य, ऊर्मी, कार्यसमाधान, स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न या बाबी जीवनात यशाकडे नेतात. कर्तृत्वाची पारंपरिक मोजपट्टी विसरून विचार केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
टी. व्ही. मालिकातील कुहू व रमा या भूमिकांमुळे लोकांच्या घरोघरी पोहोचलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी लहानपणापासून घरात असलेले वातावरण, महाविद्यालयीन जीवनात मिळालेली साथसंगत व प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे आपण एकेक टप्पा गाठत गेल्याचे सांगितले. लोकप्रियता क्षणभंगूर असून कलाकृती साकारताना कृत्रिमता नसावी, असे मत व्यक्त केले.
प्रेक्षकांच्या मनातील विचारांचा अंदाज कला दिग्दर्शक कलाकृतीमध्ये साकारतो, असे मत कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर यांनी व्यक्त केले. वेधचे समन्वयक धनंजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.