News Flash

नाशिक जिल्ह्यात हलक्या सरी

कडाक्याच्या थंडीत सापडलेल्या नाशिक शहर व परिसरात नववर्षांचे स्वागत मात्र धुक्याची दुलई आणि रिमझिम पावसात झाले.

| January 2, 2015 01:50 am

कडाक्याच्या थंडीत सापडलेल्या नाशिक शहर व परिसरात नववर्षांचे स्वागत मात्र धुक्याची दुलई आणि रिमझिम पावसात झाले. नववर्षांच्या पहिल्याच दिवसाची हलक्या सरींनी सुरूवात झाली. परिणामी, गुरूवारी दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू राहिला. ढगाळ वातावरण असल्याने काहिसा गारवाही जाणवत होता. वातावरणातील या बदलांमुळे द्राक्ष उत्पादक धास्तावला आहे.
डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर वातावरणात बदल झाले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे व जळगाव या भागात काही दिवसांपूर्वी गारांसह पाऊस झाला होता. सलग दोन दिवस झालेल्या गारपीटीने वातावरण बदलले. पुढील काळात तापमान खाली येऊ लागले. याच काळात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली असताना दिवसाही गारव्याचे अस्तित्व जाणवत आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टी व थंडीची लाट असल्याने त्या भागातून वाहत येणाऱ्याचा वाऱ्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रातील वातावरणावर पडतो. या घडामोडी घडत असताना वातावरणात पुन्हा बदल झाले नववर्षांच्या पूर्वसंध्येला बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. थंडीची लाट ओसरली असे वाटत असतानाच नववर्षांची सकाळ वेगळ्याच स्वरुपात उजाडली. काही भागात पहाटेपासून दाट धुके दाटल्याचे दिसत होते तर काही भागात ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन झाले नाही.
शहरातील इंदिरानगर, सिडकोसह, पंचवटी, गंगापूर रोड आदी भागात अचानक पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या जलधारा बरसल्या. यामुळे गारव्यात भर पडली. दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले. अधुनमधून सूर्यदर्शन झाले खरे, पण त्याचा वातावरणावर फारसा प्रभाव पडला नाही.
सकाळी पाऊस आल्याने विद्यार्थ्यांसह नोकरदारांचे हाल झाले. अनेकांना वर्षांच्या पहिल्याच दिवशी शाळेत तर काहींना कामावर पोहचण्यास उशीर झाला. या पावसाची ०.८ मिलीमीटर इतकी नोंद झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. तापमानातही काहिशी वाढ झाली असून ते ११.८ अंशावर पोहोचले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरणाचा परिणाम द्राक्ष बागांवर होत आहे. डिसेंबरच्या गारपीटीतून काही अंशी बचावलेल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शेडनेट आणि इतर साहित्याचा वापर करत द्राक्षबागा आच्छादित करण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
हवामान खाते तसेच विविध ठिकाणी उभारलेल्या केंद्राच्या माध्यमातून नेमकी काय खबरदारी घ्यावी या विषयी कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:50 am

Web Title: light showers in nashik district
Next Stories
1 वनहक्काचे १२,३२७ दावे प्रलंबित
2 सहकार विभाग कार्यालयात असाही ‘थर्टी फर्स्ट’
3 ‘थर्टी फर्स्ट’ रात्री अपघातांमध्ये एक ठार, १० जण जखमी
Just Now!
X