महापालिकेतील सत्ताधारी म्हणून ज्यांनी धोरण ठरवून निर्णय घ्यायचा त्या सेनाभाजपचे पदाधिकारी उपोषणकर्ते व ज्यांनी त्यांना विरोध करायचा त्या काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी पाठिंबा देणारे अशी आज नेहरू मंडईच्या नव्या बांधकामासाठी सुरू झालेल्या उपोषणाची अवस्था झाली. चितळे रस्त्यावर सुरू झालेल्या या उपोषणात मनपा प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ झाली.
नेहरू मंडई कृती समितीच्या वतीने अध्यक्ष वसंत लोढा व संजय झिंजे यांनी आजपासून हे बेमुदत उपोषण सुरू केले. लोढा भाजपचे आहेत तर झिंजे शिवसेनेचे. मनपात सत्ता शिवसेनाभाजपचीच आहे. नेहरू मंडई पाडली तिथे नवे व्यापारी संकुल खासगीरकरणातून बांधायचे आहे. त्याची निविदा ५ वेळा प्रसिद्ध झाली तरीही कोणाचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सत्ताधारी सेनाभाजपनेच धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असताना कृती समितीने याचे खापर प्रशासनावर फोडले आहे. प्रशासन अकार्यक्षम नाकर्ते असल्याचा आरोप करत सकाळी ११ वाजल्यापासून हे उपोषण सुरू करण्यात आले. त्यांना पाठिंबा म्हणून चितळे रस्त्यावरील सर्व भाजी व फळ विक्रेत्यांनी आज व्यवहार बंद ठेवले.
उपोषण सुरू झाल्यावर दुपापर्यंत तिथे उपमहापौर गीतांजली काळे (भाजप), माजी महापौर संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले (सर्व राष्ट्रवादी), ऊबेद शेख, ब्रिजलाल सारडा (काँग्रेस), सचिन डफळ (मनसे), अंबादास पंधाडे (शिवसेना) तसेच अन्य नेत्यांनी हजेरी लावली. सगळ्यांनीच प्रशासन अत्यंत बेजबाबदार असल्याची टिका केली. काहींनी सत्ताधाऱ्यांनाही धारेवर धरले. गेल्या अनेक वर्षांत नगर शहरात काहीही नवे काम झालेले नाही अशी टिका करण्यात आली. खासगीरकरणाऐवजी नेहरू मंडईचे नवे बांधकाम मनपानेच करावे, त्यामुळे मनपाला इमारतीपासून कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल अशी सुचना वक्तयांनी केली.
प्रशासनाच्या वतीने प्रभारी उपायुक्त संजीव परशरामे, शहर अभियंता नंदकुमार मगर, अभियंता विलास सोनटक्के व कनिष्ठ अभियंता कापरे असे चारजण लोढा व झिंजे यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी दुपारी आले होते. त्यांनीही हा विषय स्थायी समितीच्या अखत्यारीतील आहे, खासगीरकरण रद्द करून मनपाने बांधकाम करायचे असले तरीही तसा निर्णय स्थायी समितीलाच घ्यावा लागेल व खासगीरकरणासाठी विकासकाने द्यायची २ कोटी ५० लाख ही रक्कम कमी करायची असेल तरीही ते स्थायी समितीलाच ठरवावे लागेल असे प्रशासनाने स्पष्ट
केले.
मात्र लोढा तसेच झिंजे यांनी ते अमान्य केले व प्रशासनाने लेखी स्वरूपात आम्हाला मनपाच बांधकाम करेल असे द्यावे असा आग्रह धरला. आयुक्त विजय कुलकर्णी रजेवर, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे मुंबईला, नगररचनाकार विश्वनाथ दहे कार्यालयात नाहीत, त्यामुळे परशरामे यांना कसलेही आश्वासन देता येईना. तरीही त्यांनी उपायुक्त व नंतर आयुक्तांबरोबरही मोबाईलवर चर्चा केली, मात्र त्यांनीही हा विषय स्थायीचा आहे, फार तर त्यांना तसे प्रस्तावीत करता येईल व तो प्रस्ताव लवकर तयार करू असे सांगितले. लोढा व झिंजे यांनी तेही लेखी मागितले. त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली व उपोषण सुरूच राहिले. लोढा व झिंजे यांनी सांगितले की ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार आहोत. उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या चितळे रस्त्यावरील सर्व दुकानदार व्यवहार बंद ठेवणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
रोख धुरिणांवर
उपोषणकर्ते सेनाभाजपचे असले तरीही त्यांचा सगळा रोख मनपातील सत्ताधारी सेनाभाजपच्या धुरिणांवरच आहे. तशी चर्चाही उपोषणस्थळी सुरू होती. मात्र स्पष्टपणे तसे बोलायला कोणीही तयार नाही. लोढा, झिंजे यांना त्याबाबत स्पष्ट विचारल्यावर त्यांनी तसे काहीही नाही असे सांगत या विषयावर काहीही बोलण्याचे टाळले.