16महाविद्यालयीन रंगकर्मीमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यास येथील महाकवि कालिदास कलामंदिरात मंगळवारी सुरूवात झाली. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तूत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेतील प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवशी विषयातील वैविध्य..संहितेची आकर्षक मांडणी..मिळालेल्या व्यासपीठाचा पुरेपूर वापर करून घेण्याची धडपड..एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती आणि पहिल्यांदाच दिग्गज परीक्षक आणि नामवंत कलाकारांसमोर अभिनय करूनही दाखवलेला धीटपणा, हे सर्व काही पाहावयास मिळाले. ग्रामीण भागातील अधिक महाविद्यालयांचा सहभाग हे या दिवसाचे वैशिष्टय़े ठरले.
‘अस्तित्व’ संस्थेचे सहकार्य, झी मराठी वाहिनीचे माध्यम प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेची सुरूवात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हं. प्रा. ठा. महाविद्यालयातील केंद्राच्या वतीने सादर करण्यात आलेल्या श्रध्दा कराळे लिखीत ‘पाठवण’ या एकांकिकेने झाली. डॉ. कविता बोंडे दिग्दर्शित या एकांकिकेत स्वत: दिग्दर्शकासह श्रध्दा कराळे, अमृता भालेराव-गडकरी यांनी भूमिका साकारल्या. एकविसाव्या शतकात स्त्री स्वातंत्र्याचे वारे वाहत असले तरी स्त्री अद्याप बंदिनीच आहे. विविध चालीरिती, संस्कृती आणि परंपरा याचा तिच्यावर असणारा पगडा, ज्येष्ठांचा धाकवजा आदर, यातून नव्या पिढीवर करावयाचे संस्कार याचे अनामिक ओझे. जुने की नवे या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या आजच्या स्त्रीच्या मनाची होणारी फरफट यांचा ‘पाठवण’ मध्ये वेध घेण्यात आला. सिन्नर येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालयातर्फे सादर करण्यात आलेल्या ॠषिकेश जाधव लिखीत ‘चार भिंती, एक छप्पर’ या एकांकिकेत म्हातारपणी आई-वडिलांवर जवळच्या नातेवाईकांकडूनच होणाऱ्या त्रासाची कथा मांडण्यात आली. बदलत्या जमान्यात वृध्दत्व एक शाप होऊन गेला आहे. आजच्या पिढीला घरातील वृध्द म्हणजे अडगळ वाटते. त्यांचे उपदेश, फुकटचे सल्ले, त्यांचा घरातील वावर, बडबड त्रासदायक वाटून त्यांच्यासाठी वृध्दाश्रमाचा पर्याय स्वीकारला जातो. परंतु ॠतूमानात एक वर्तुळ पूर्ण झाल्यावर आपण स्वीकारलेला पर्याय जेव्हा आपल्यावरच उलटतो तेव्हां त्याचे काय, यावर ‘चार भिंती..’ मध्ये भाष्य करण्यात आले. शुभम कुमावत, प्रतिक्षा शिंदे, काजल निसाळ, हरिश बेदडे, सरला माळी, प्रतिक्षा शिंदे यांनी या एकांकिकेत भूमिका साकारल्या. तांत्रिक बाजू राहुल मुळे, संजय वाघ, प्रविण शिंदे, मनिषा दोंड, अमित अहिरे, गंगाराम ठाकूर यांनी सांभाळली.
17पहिल्या दोन्ही एकांकिकांमधून कुटूंब आणि संस्कार हे विषय मांडण्यात आल्यावर मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने ‘बाबा तडतडी’ एकांकिकेतून संसर्गजन्य आजाराविषयी जनजागरण आणि अंधश्रद्धेवर प्रहार केला. कोमल शर्मा या विद्यार्थिनीने लिहिलेल्या या एकांकिकेत तिच्यासह ॠतुजा अचलिया, ॠतुजा संकलेचा, पूजा पारीख, प्रशांत मोरे, मयूर गोसावी, अकुब शेख, गोविंद सोनवणे, दत्तु बिडगर, संतोष खरे, हर्ष कांबळे, इंद्रायणी खरे, रविना खैरे, सुवर्णा भिलोरे यांनी विविध भूमिका साकारल्या. क्षयरोगासारखा संसर्गजन्य आजार कशामुळे होतो.. हा आजार झाल्यावर काय खबरदारी घ्यावी..औषधोपचार कसा असावा, याबाबत माहिती देण्यात आली. मात्र त्याचवेळी हे सर्व दूर सारत बुवाबाजीला दिलेले प्राधान्य, त्यातून सर्वसामान्यांची होणारी लूट आणि दलाली यावर एकांकिकेव्दारे प्रकाश टाकण्यात आला. वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कला व वाणिज्य महाविद्यालयाने विशाल शिंगाडे याची ‘कॉलेज कट्टा’ ही एकांकिका सादर केली. ग्रामीण भागात कट्टय़ावर रंगणारे राजकारण, सुरू असलेले गाव पुढारीपण, एकमेकांमधील चढाओढ यात सामान्यांची होणारी फरफट यावर भाष्य करण्यात आले.
विशाल शिंगाडे, विक्रम वाडेकर, पप्पु सताळे, अमोल उगले, विश्वदिप निरभवणे, समाधान पगार, चेतन घडवजे, मनोज महाले यांनी भूमिका केल्या. देवळा येथील कर्मवीर रावरावजी आहेर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने संतोष दाणी लिखीत तसेच दिग्दर्शित ‘टाईमपास’ ही एकांकिका सादर केली. नावाप्रमाणेच ही एकांकिका निव्वळ टाईमपास ठरली. लग्र जमविणाऱ्या संस्था, काही वेळा यात होणारा सावळागोंधळ याकडे एकांकिकेने लक्ष वेधले. दाणी याच्यासह रवींद्र बच्छाव, कैलास आहिरे, पुंडलिक पवार, मयूर पवार, विकास बस्ते, अक्रम तांबोळी, मुन्ना आढाव, भूषण आहेर, मोहिनी पगार, मिनाक्षी बच्छाव यांनी भूमिकांमध्ये रंग भरण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या दिवशीच्या अखेरच्या सत्राचा समारोप नाशिक येथील न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्रफुल्ल लेले लिखीत तसेच दिग्दर्शित ‘इटर्नल टूथ’ एकांकिकेने झाला. कोणाचे कोणावाचून अडत नाही हे त्रिकालबाधित सत्य असतांना जगतांना माणसे नाहक नात्याचा गुंता वाढवून ठेवतात. या गुंत्यात स्वार्थी, आपल्यावर मनापासून प्रेम करणारी काही तटस्थ मंडळी सहज सामावली जाते आणि आपण मात्र हे सर्व आपले म्हणत बांडगुळ पाठीवर मिरवत राहतो, यावर एकांकिकेने प्रकाश टाकला. लेले याच्यासह राज जोशी, स्नेहा आरेकर, अपूर्वा महाजन, प्रसाद जाखडी, ॠतुजा वैशंपायन, मोहिनी भट यांच्या अभिनयाने एकांकिकेची रंगत अधिकच वाढवली.
परीक्षक म्हणून दिग्दर्शक प्रशांत हिरे, लेखक चारूदत्त कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी टॅलंट पार्टनर आयरिस या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते श्रीरंग देशमुख, ‘दुनियादारी’ फेम ‘अशक्या’ अजिंक्य जोशी, मनिष दळवी उपस्थित होते.