कुर्ला, नेहरूनगर येथील महानगरपालिकेच्या शाळेची तीन वर्षांपूर्वी तब्बल साडेचार कोटी रुपये खर्चून करण्यात आलेली दुरुस्ती अखेर बनाव असल्याचेच सिद्ध झाले आहे. कारण तकलादू कामामुळे अवघ्या त्चार वर्षांतच या इमारतीला पुन्हा धोकादायक म्हणून जाहीर करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. पालिकेच्या गलथान कारभाराचा फटका येथील हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांना सहन करावा लागत आहे. कारण या धोकादायक इमारतीत विद्यार्थी-शिक्षकांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना इतर शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. पण इथे या विद्यार्थ्यांचे इतके हाल आहेत की त्यांना बसण्यास साधी बाकेही नाहीत.
एल विभागात असलेल्या या शाळेच्या दुरुस्तीवर पालिकेने तब्बल ४.४० कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु ४० वर्षे जुनी ही इमारत खरे तर दुरुस्तीच्या पलीकडे गेली होती. त्यामुळे दुरुस्तीऐवजी शाळेसाठी नवीन इमारतच बांधण्यात यावी, अशी मागणी त्या वेळेस करण्यात येत होती. परंतु ही धुडकावून करोडो रुपये खर्चून इमारतीच्या दुरुस्तीचा घाट घातला गेला. दुरुस्ती सुरू असतानाच इमारतीचा खांब खचल्याचे निदर्शनास आले. त्याची साधी चौकशीही तेव्हा झाली नाही. २०१३ च्या सुमारास ही इमारत दुरुस्त झाली. परंतु अवघ्या दोन वर्षांतच पाणी गळती, भिंतींना तडे, प्लंबिंगच्या समस्या, प्लास्टर, इलेक्ट्रॉनिक वस्तू तुटण्याच्या तक्रारी येऊ लागल्या. शाळेच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळचा भाग खचल्याने गॅलरीच्या तळमजल्यावरील लोखंडी जाळ्या वाकल्या आहेत. अनेक ठिकाणी लाकडी खांबांचे टेकू इमारतीला लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात तर इतके पाणी गळते की शाळेत सर्वत्र पाण्याचे तळे साचलेले दिसते.
अशा असंख्य तक्रारींमुळे या शाळेतील हजारो मुलांना जवळच्या शिवसृष्टी शाळेत हलविण्यात आले; परंतु या ठिकाणी शाळेच्या मुलांना बसण्यास बाकही नाहीत. पालिकेच्या गलथान कारभाराचा फटका अशा पद्धतीने शाळेतील विद्यार्थी-शिक्षकांना बसतो आहेत. पालिका शिक्षण समितीचे सदस्य शिवनाथ दराडे यांनी हा सर्व प्रकार पत्राद्वारे आयुक्त अजोय मेहता यांच्या निदर्शनास आणला आहे. ‘शाळेच्या दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे हे उघड आहे. या सगळ्याला जबाबदार असलेले अभियंते, स्ट्रक्चरल ऑडिटर्स, कंत्राटदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुलाचे बोट तुटले
दुरुस्तीच्या कामातही इतका हलगर्जीपणा होता की त्यामुळे झालेल्या अपघातात शाळेतील एका मुलाला बोट गमवावे लागले. शाळेचा सूचना फलक इतरत्र हलविण्यात आला होता. परंतु भला मोठा सूचना फलक अवघ्या एका खिळ्याच्या साहाय्याने लटकविण्यात आल्याने तो एका मुलाच्या पायावर पडला. त्यात त्याला पायाचे बोट गमवावे लागले.

शाळेला दुरुस्तीची नव्हे तर पुनर्बाधणीची गरज आहे हे आपण तेव्हाच पालिका प्रशासनाला कळविले होते; परंतु प्रशासनाने दुरुस्तीचा आग्रह कायम ठेवला. चार वर्षांतच ही इमारत पुन्हा धोकादायक अवस्थेला आली आहे. आता या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याऐवजी शाळेच्या रिकाम्या इमारतीचे काय करायचे यासाठी पालिकेने तिसऱ्यांदा सल्लागाराची नियुक्ती केली आहे.
अनुराधा पेडणेकर, स्थानिक नगरसेविका