कल्याण-डोंबिवली पालिकेने मूळ पदावर नियुक्त केलेले अनेक अधिकारी अन्य विभागांत कार्यरत असल्याने त्यांच्या जागांवर पात्रता नसलेले अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभारात अनागोंदी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासन नियमानुसार कोणत्याही कर्मचारी, अधिकाऱ्याला सहा महिन्यांहून अधिक काळ प्रभारी ठेवता येत नाही. या कर्मचाऱ्यांच्या प्रभारी पदभाराची मुदत वाढवायची असल्यास ते विषय पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे चर्चेसाठी आणले जावेत, असा नियम आहे. या संदर्भात नगरविकास विभागाकडे या प्रभारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांविरोधात जागरूक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या जनसंपर्क विभागात साहाय्यक जनसंपर्क अधिकारी पदावर माधवी क ऱ्हाडकर-पोफळे यांची सरळसेवा भरतीने नियुक्ती केली होती. त्यांची पत्रकारितेमधील पदवी, त्यामधील अनुभवातून ही नियुक्ती करण्यात आली होती. असे असताना पोफळे यांची लेखापरीक्षक विभागात बदली केली. त्यांच्या जागी प्रसाद ठाकूर या कारकून संवर्गातील कर्मचाऱ्याला बसविण्यात आले आहे. लहू सोमा वाघमारे यांची पालिकेतील मूळ नियुक्ती लेखा परीक्षक पदावरील आहे. ते आता ‘ह’ प्रभागात प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आनंद सरूयवंशी कनिष्ठ विधि अधिकारी, विधि विभागातील विनायक पांडे ‘फ’ प्रभागात प्रभाग क्षेत्र अधिकारी, प्रभाग क्षेत्र अधिकारी असलेले सुभाष भुजबळ सचिव कार्यालयात सचिव, प्रभाग अधिकारी विनायक कुळकर्णी साहाय्यक आयुक्त, रवींद्र गायकवाड अधीक्षक, आरोग्य निरीक्षक गणेश बोराडे हे साहाय्यक आयुक्त, कृष्णा लेंडेकर, मधुकर शिंदे, चंदुलाल पारचे, अरुण वानखेडे यांच्याकडे प्रभाग अधिकारी म्हणून प्रभारी पदभार आहेत. चार मुकादमांकडे आरोग्य निरीक्षक म्हणून पदभार आहे. हुशार प्रभाग अधिकारी अनिल लाड यांच्याकडील महत्त्वाचे पदभार काढून घेण्यात आले आहेत, असे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. हे सर्व प्रभारी पदभार असलेले अधिकारी गेले दीड ते दोन वर्षांपासून आपली मूळ पदे सोडून अन्य विभागांत नियमबाह्य़पणे कार्यरत आहेत. याविषयी प्रशासन, पालिका पदाधिकारी गूपचिळी धरून बसले आहेत.