* उर्वरित भाग आज पाडणार
* संरचना अभियंता, वास्तुविशारदाला स्पष्टीकरण देण्याचे आदेश
* चौकशी समितीची स्थापना
माहीमच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील ‘आफ्ताब’ इमारतीसाठी वापरलेले सिमेंट आणि अन्य साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले असून इमारतीचा उर्वरित भाग येत्या शनिवारी पाडण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. दरम्यान, संबंधित संरचना अभियंता आणि वास्तुविशारदाला तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
पालिकेच्या संबंधित विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन १९८५ ‘आफ्ताब’ इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीसाठी वापरलेले सिमेंट आणि स्टेनलेस स्टील दुय्यम दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे इमारतीचा उर्वरित भाग पाडून टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून ही कारवाई येत्या शनिवारी करण्यात येणार आहे.
ही इमारत धोकादायक असल्याची कोणतीही तक्रार रहिवाशी अथवा मालकाकडून करण्यात आलेली नव्हती. या इमारतीची मलनि:स्सारण वाहिनी तुंबल्याची तक्रार २३ नोव्हेंबर २०१० रोजी पालिकेच्या संकेतस्थळावर करण्यात आली होती. तसेच या इमारतीच्या छतावर उभारण्यात आलेल्या जाहिरातीच्या फलकाबाबत रिझवान र्मचट यांनी १३ मार्च २०१३ रोजी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र त्यानंतर हा फलक हटविण्यात आला. या इमारतीच्या पाठीमागे उभारलेल्या अनधिकृत शेडमुळे डासांची उत्पत्ती होऊ शकते, अशी तक्रार २२ ऑक्टोबर २०१२ रोजी पालिकेकडे करण्यात आली होती. त्यावर पालिकेकडून करवाई करण्यात आली होती, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या इमारतीचे संरचना अभियंता आणि वास्तुविशारदाला इमारत दुर्घटनेबाबत संभाव्य कारणांसह तीन दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. तसेच या दुर्घटनेमागील कारणे शोधण्यासाठी पालिका उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यात संरचनात्मक अभियंता आणि वास्तुविशारदाचा समावेश आहे.