केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाकडून मच्छीमारांसाठी कोंढरी येथे मत्स्य केंद्राची उभारणी केली जात आहे. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने कामाची चौकशी करावी अशी मागणी करंजा पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
मत्स्य केंद्र प्रकल्पात जेटी(रॅम्प)च्या उभारणीसाठी १ कोटी २९ लाख रुपये, जोडरस्त्यासाठी १ कोटी ७२ लाख, भरावासाठी ९४ लाख, जाळी विणण्याच्या शेडच्या उभारणीसाठी १२.७१ लाख रुपये, लिलावगृहाच्या उभारणीसाठी ४४.८२ लाख रुपये, प्रसाधनगृहाच्या उभारणीसाठी १२.६५ लाख,मासे सुकविण्यासाठी ओटा -९.१६ लाख तर पाणीपुरवठा व ड्रेनेजची सुविधा निर्माण करण्यासाठी २.९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.  कामाची मुदत १४ मे २०१३ पर्यंतची असताना मे २०१४ उजाडल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. मत्स्य व्यवसाय विभाग व महाराष्ट्र सरकारच्या बंदर अभियंत्याची बैठक बोलाविण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.