पावसाळ्यातील तीन महिने हा माशांचा प्रजननाचा कालावधी असल्याने या काळात मासेमारी करण्यास महाराष्ट्र सरकारकडून बंदी घातली जाते. त्यानुसार शासनाच्या मच्छीमार विभागाने बंदी जाहीर केली आहे. १५ जून ते १५ ऑगस्ट यादरम्यान ही बंदी लागू असणार आहे. त्यामुळे येत्या रविवारपासून समुद्रातील हजारो मच्छीमार बोटींच्या इंजिनांची धडधड विसावणार आहे.
राज्याला लाभलेल्या अफाट समुद्रकिनाऱ्यावरील हजारो मच्छीमार कुटुंबांचे जीवन मासेमारीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. मच्छीमारी व्यवसायातून निर्यात करण्यात येणाऱ्या मासळीमुळे केंद्र व राज्य सरकारला परकीय चलनही मिळते. मात्र सध्या मासळीचा वाढता दुष्काळ व समुद्रातील वाढते प्रदूषण यामुळे मासेमारी व्यवसायच धोक्यात आलेला आहे. मासेमारी व्यवसाय हा मासळीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो, त्यासाठी निसर्गनियमानुसार जैवविविधेच्या नियमानुसार समुद्रातील मासे किनाऱ्यानजीक प्रजननासाठी येतात. तीन महिन्यांच्या कालावधीत मासळीची निर्मिती झाल्यानंतर ती समुद्रात मोठी होते व त्याचा फायदा मासेमारांना होतो. त्याचप्रमाणे पावसाळ्यातील जून ते ऑगस्ट म्हणजेच नारळी पोर्णिमेपर्यंत समुद्र खवळलेला असतो. या कालावधीत समुद्रात निर्माण होणाऱ्या महाकाय लाटांमुळे मच्छीमारांच्या जिवाला धोका संभवत असल्यानेही मासेमारीवर बंदी घातली जाते. शासनाने या कालावधीत मासेमारी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही संकेत दिलेले आहेत.