एप्रिल महिन्यातील वीज आकार देयकाबरोबरच ‘सुरक्षा ठेव जमा’चे देयक देण्यात आल्याने वीज ग्राहकांना धक्का बसला आहे. ही रक्कम साधारण एक हजार रुपयाच्या पुढे असल्याचे सांगण्यात येते.
महावितरणाच्या वतीने जुने मीटर काढून रेडिओ फ्रीक्वेन्सी मीटर बसवण्यात आल्यामुळे वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज बिल येत आहेत. त्यातच ऐन उन्हाळयाच्या दिवसांत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एप्रिल महिन्यामध्ये विद्युत देयकबरोबर सुरक्षा ठेव जमाचे विद्युत देयक आल्याने महावितरणच्या कार्यालयामध्ये चौकशी करण्यासाठी ग्राहक येत आहे.
या संदर्भात महावितरणाचे अति. कार्यकारी अभियंता सतीश सरोदे म्हणाले की, ग्राहकांचे तीन महिन्यांचे सरासरी बिल काढले जाते. त्याप्रमाणे दर महिना किती विद्युत देयक येते याची रक्कम ठरवून तेवढी रक्कम ही सुरक्षा ठेव जमा म्हणून ठेवण्यात येते. सुरक्षा ठेव जमा रक्कम भरली नाही तर त्यावर व्याज आकारणी करण्यात येते. सुरक्षा ठेव जमा भरण्यात आले नाही तर महावितरणच्या नियमानुसार नोटीस पाठवण्यात येईल. मात्र वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही. परंतु सुरक्षा ठेव जमाचे देयक हे भरण्यात यावे, असे आवाहन सरोदे यांनी केले आहे.