राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने श्रेणी सुधारण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. फेब्रुवारीपासून कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी निर्देश क्रमांक एक नुसार अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. पूर्वीही श्रेणी सुधारण्याची संधी होतीच पण त्यासाठी पदवी विद्यापीठाला अर्पण करून पूर्ण विषय विद्यार्थ्यांला द्यावे लागायचे. कधीकधी त्याला आहे त्या गुणांपेक्षाही कमी गुण मिळायचे. सर्वच विषयांचा अभ्यास आणि गुण वाढतीलच याची हमी नसल्याने विद्यार्थी श्रेणी सुधारण्याच्या भानगडीत पडत नसत. त्यामुळे त्याला बी-प्लस नसेल तर पीएच.डी. करता येत नसे. विद्यापीठ अध्यादेशातही श्रेणी सुधार करण्याची सुविधा होती तरी इतर नियमांमुळे विद्यार्थी श्रेणी सुधार करण्यासाठी हयगय करीत.
मात्र पूर्वीच्या गुणांची शाश्वती आणि श्रेणी सुधारण्यासाठी पुरेसा कालवधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पूर्वीसारखे सर्वच्या सर्व विषय न देता केवळ एक तृतीआंश विषय विद्यार्थ्यांला द्यावे लागणार आहेत. म्हणजे प्रथम व द्वितीय वर्षांचे मिळून आठ विषय असतील तर विद्यार्थ्यांना त्यापैकी कोणतेही दोन विषय देऊन श्रेणी सुधार करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांने परीक्षा विभागाकडे अर्ज केल्यानंतर त्याला तीन वर्षांमध्ये सहावेळा परीक्षा देता येतील. महत्त्वाचे म्हणजे १९९६पासूनच्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
विद्यार्थी यावर्षीचा असेल तर तीन वर्षांची आणि पूर्वीचा असेल तर श्रेणी सुधारण्यासाठी चारदा प्रयत्न म्हणजे दोन वर्षांचा कालावधी मिळेल. विशेष म्हणजे ज्या विषयांचे अभ्यासक्रम बदलले आहेत. अशा विषयांमध्ये विद्यार्थ्यांने सध्याच्या समकक्ष विषयांची खातरजमा विद्यापीठाकडून करून घ्यायची आहे. अर्ज करतानाच परीक्षा विभागाला समकक्ष विषय विचारून त्याने श्रेणी सुधारासाठी पुढील प्रयत्न करायचे आहेत. विद्यार्थ्यांचा श्रेणी सुधार झाला नाही तरी त्याला त्याची विद्यापीठाकडे असलेली गुणपत्रिका परत मिळणार आहे. यासाठी सध्याचे शुल्क लागू करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विधिसभा सदस्य अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी केले आहे.