कामोठे परिसरात रस्त्याकडेला सिडकोच्या पाणीपुरवठय़ाच्या कामासाठी ठेवलेले पाइप चोरणाऱ्यांना कामोठे पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली. त्यांच्याकडून पाइप जप्त केले असून या पाइपाची किंमत १२ लाख रुपये आहे. ही घटना शुक्रवारी घडली. बनवाट पावतीच्या आधारे ही चोरी करण्यात आली होती.
कामोठे येथून उरणला जाणाऱ्या मार्गालगत सिडकोच्या कंत्राटदाराने दोन लाख रुपये किमतीचे असे ८० पाइप येथे ठेवले आहेत. यापैकी सहा पाइप चोरटय़ांनी चोरले होते. या पाइपचा व्यास सहा फूट व लांबी ४० फूट एवढा आहे. चोरटय़ांनी बनावट पावतीच्या आधारे येथील रखवालदाराला पाइप नेत असल्याचे सांगून हे पाइप येथून नेले. त्यासाठी क्रेन व दोन ट्रेलरचा वापर करण्यात आला. पोलीस निरीक्षक टी. बी. माने यांच्या पथकाने रखवालदाराकडील नोंदवहीमधील क्रेनच्या क्रमांकावरून क्रेनमालकाचा शोध घेतल्यानंतर ट्रेलर व क्रेन भाडय़ाने घेतल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीस मुद्देमालापर्यंत पोहचू शकले. पोलिसांनी भिवंडी येथून पाइप, क्रेन व ट्रेलर जप्त केले आहेत. या प्रकरणी नूर मोहम्मद राजा खान, मोहम्मद अख्तर मोहम्मद यांच्यासह ट्रेलर व क्रेनचालकांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी दिली. सिडकोच्या कंत्राटदारांनी या पाइपच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केल्याने ही चोरी झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.