डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विभागातील आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाने ईबीसी मंजूर केली. लवकरच या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे मिळणार असल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.
सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थी आर्थिकदृष्टय़ा मागास असेल, तर त्यांच्या शैक्षणिक शुल्कातील ५० टक्के भार राज्य सरकार उचलते. या साठी ईबीसीची सवलत दिली जाते. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असेल व पाल्याचा प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून झाला असेल असे विद्यार्थी या योजनेस पात्र असतात. कायम विनाअनुदानित संस्थांमध्येही ईबीसी सवलत देण्याचा नियम आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागातील विद्यार्थी या सवलतीपासून वंचित होते. मराठवाडय़ातील दुष्काळी स्थिती लक्षात घेता हा प्रश्न लवकर मार्गी लावावा, या साठी आमदार चव्हाण हे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करीत होते.
या पाठपुराव्याला यश आले असून, तंत्रशिक्षण विभागाकडून यासाठी १० लाख ७२ हजार ५०० रुपयांचा धनादेश विद्यापीठाकडे दिला जाणार आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना लवकरच ही रक्कम वाटप करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.