महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून गरीब मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, हा उद्देश आहे. योजनेंतर्गत सर्व कामे मजुरांच्या हातानेच करावीत. मजुरांना डावलून कोणी यंत्राद्वारे कामे करीत असेल, तर याची लगेच माहिती द्यावी. यंत्राद्वारे काम केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाथरी पंचायत समिती सभागृहात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी पं. स. सभापती अर्चना पाटील होत्या. रोहयो उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, जि. प. सदस्य चक्रधर उगले, दादासाहेब टेंगसे, अनिल नखाते, सुरेश ढगे, तहसीलदार देविदास गाढे, पं. स. सदस्य डॉ. बाळासाहेब घोक्षे, गटविकास अधिकारी श्रीमती पांडव आदी उपस्थित होते.
मनरेगा योजनांची माहिती शेतकरी, कामगारांपर्यत पोहोचावी, यासाठी जनतेच्या प्रत्यक्ष संपर्कात राहणे गरजेचे आहे. योजनांची सखोल माहिती कर्मचाऱ्यांना असली पाहिजे, तरच योजना यशस्वी होतात, असे सिंह यांनी सांगितले. मनरेगाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या. नारायण काळे यांनी सूत्रसंचालन केले.